सिंधुदुर्ग: भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ चा कार्यक्रम जाहिर केला आहे.आदर्श आचार संहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विविध बँकांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता कालावधीत सर्वं बँकांनी संशयास्पद व्यवहारावर (Suspicious Transactions) लक्ष ठेवावे आणि अशा सर्व व्यवहारांची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी असे निर्देश जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील सर्व बॅंक अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मुकेश मेश्राम तसेच सर्व बँकांचे समन्वयक उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीत पैशाचा गैरवापर प्रभावीपणे रोखण्यासाठी आणि नि:ष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी काही पावले उचललेली आहेत. यामध्ये बँकांची भूमिका महत्वाची आहे. ज्या खात्यातुन अनेक दिवसांपासून व्यवहार कोणतेही व्यवहार होत नसतील आणि आता अचानक त्या खात्यातून व्यवहार होत असतील तर त्यावर बारकाईन लक्ष ठेवावे. उमेदवाराचे एक खाते असताना निवडणूक प्रक्रियेसाठी दुसरे खाते उघडायचे असल्यास त्यांना सहकार्य करावे. बँकेच्या एखाद्या शाखेत पैशाची मागणी अचानक वाढली आहे का, याबाबतही बँकांनी माहिती संकलित करावी. तसेच इतर दैनंदिन व्यवहारांवर देखील लक्ष ठेवावे काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. निवडणूक खर्चाचे अनुषंगाने सर्व प्रकारच्या (UPI, RTGS, NEFT) पैसे काढणे व पैसे भरणे व्यवहारांबाबत जिल्हास्तरीय निवडणूक खर्च नियंत्रण समितीस अवगत करावे, E-SMS मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे. बॅंकाच्या नियमित व्यवहारांवर कोणतीही बंधने नाहीत. बॅंकांनी ही माहिती सादर करीत असताना सर्वसामान्य ग्राहकांना त्रास अथवा अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.
श्री शेवाळे म्हणाले, जिल्ह्यातील बँकाकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमांच्या व्यवहारांवर प्रशासन करडी नजर ठेवून आहे. यासाठी बँकांनी आपापल्या बँकेच्या पातळीवर समन्वयक अधिकारी नियुक्त करावेत आणि या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून याबाबतची माहिती अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा प्रशासनाला तत्काळ द्यावी असेही ते म्हणाले.
श्री मेश्राम यांनी बैठकीच्या सुरूवातील भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती उपस्थितांना दिली. सर्व बँक अधिकाऱ्यांनी आचार संहितेच्या कालावधीत अधिक सजगपणे काम करावे. एटीएम व्हॅन मधून रोख रक्कम घेऊन जाताना आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असेही ते म्हणाले.