Home शिक्षण कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार! शिक्षण निधी वितरण, रोटरी क्लब माहिमच्या वतीने...

कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार! शिक्षण निधी वितरण, रोटरी क्लब माहिमच्या वतीने सायकल वितरण.

147

मसुरे प्रतिनिधी: बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने कट्टा, वराड, चौके, तळगाव, पेंडूर या हायस्कूल मधील १० वी व १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी इस्त्रोचे सेवानिवृत अधिकारी देविदास पवार यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. अंतराळ क्षेत्रात १०० टक्के अचुकता आवश्यक असते. तरच प्रोजेक्ट यशस्वी होतात. विद्यार्थ्यानी सुद्धा आपल्या क्षेत्रात असेच जिद्दीने १०० टक्के यश मिळवावे. सेवांगण च्या उपक्रमांचे कौतुक करून आपले सहकार्य असेल असे ते म्हणाले.

प्रोग्रेस हायस्कूल पणजीच्या माजी मुख्याध्यापिका शोभा म्हाडगुत यांनी मुलांचे कौतुक केले. माझ्या गावात गुणवंताचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभतेय याचा खूप आनंद वाटतो. विद्यार्थ्यानी आपले यश असेच टिकवून ठेवावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. रश्मी पाटील यानीही मुलाना मार्गदर्शन केले व या गुणानी भूलून न जाता कठोर परिश्रम करून यश टिकवून ठेवावे असे आवाहन केले.

दीपक भोगटे यांनी प्रास्ताविकात सेवांगणच्या उपक्रमांची माहिती दिली. नांदोसकर गुरुजी यानीही विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. तन्वी म्हाडगुत हिने आपल्या यशात शिक्षक व पालक प्रामुख्याने आई चा वाटा असल्याचे सांगितले. व भरपूर अभ्यास व शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यासात सुधारणा यामुळे मी यश मिळवू शकले असे सांगितले. माझ्या या वाटचालीत सेवांगणचा सुद्धा वाटा आहे असेही ती म्हणाली.

यावेळी रोटरी क्लब मुंबई माहिम यांच्या वतीने ३ गुणवंत मुलीना सायकलचे वितरण करण्यात आले. सेवांगणच्या शिक्षण निधीतील ३८ विद्यार्थ्याना शिक्षणनिधीचे वितरण करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारावी परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी तन्वी केदार म्हाडगुत हिचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कट्टा शाखेच्या कार्यवाह वैष्णवी लाड यांनी केले. त्यांनी ही निट परीक्षेची माहिती मुलाना दिली.

या कार्यक्रमास देवीदास पवार, शोभा म्हाडगुत, रश्मी पाटील, बापू तळावडेकर, किशोर शिरोडकर, शैलेश खांडाळेकर, हडलगेकर सर,संजय आचरेकर, शाम पावसकर, दीपक भोगटे, विद्याधर चिंदरकर, सुजाता पावसकर, शिक्षक व पालक व विद्यार्थी उपस्थित होते.