२० एप्रिल वार्ता: महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. आज नरेंद्र मोदी नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात दोन जंगी सभा घेणार आहेत.
या सभेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि महायुतीचे अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.
या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणीत जाणार असून दुपारी २ वाजेच्या सुमारास सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. सभेत कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवला आहे. मोदींच्या सुरक्षतेसाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.