Home स्टोरी गुढी हिंदु नववर्षाची… मुहूर्तमेढ सुराज्याची !

गुढी हिंदु नववर्षाची… मुहूर्तमेढ सुराज्याची !

219

देशभरात ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण !

 

९ एप्रिल वार्ताहर: हिंदु नववर्षाच्या निमित्ताने सुराज्याची मुहूर्तमेढ करण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’, ‘हिंदु जनजागृती समिती’, मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, हिंदुत्वनिष्ट संघटना आणि धर्मप्रेमी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सुमारे ३३८ ठिकाणी सामूहिक गुढी उभारून गुढीपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी अनेक ठिकाणी मंदिरांची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. गुढीपूजनानंतर सर्वांनी एकत्र येऊन ‘सुराज्य स्थापन’ करण्याची सामूहिक शपथ घेतली, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक तथा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

सामूहिक गुढी महाराष्ट्रात २३९, कर्नाटकात ६०, गोव्यात ३५, तर उत्तर प्रदेश राज्यात ४ ठिकाणी उभारण्यात आली. सामूहिक गुढी उभारण्यात पुणे येथील ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर देवस्थान, छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर देवस्थान, ओझर (पुणे) येथील श्री विघ्नहर गणपती मंदिरांसह अनेक मंदिरांनी पुढाकार घेतला. तसेच काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी, चौकात, मैदानात सामूहिक गुढी उभारण्यात आली. श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये रामराज्याच्या स्थापनेसाठी, तसेच रामराज्यासाठी लढणार्‍या सर्व धर्मप्रेमींना शक्ती मिळावी म्हणून भगवान शंकराला अभिषेक घालण्यात आला. यात विशेष म्हणजे अनेक ठिकाणी गुढी उभारण्यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त आणि लक्षणिय सहभाग होता. मुंबई-पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी शाखे’च्या मुलींनी स्वसंरक्षणाची काही प्रात्याक्षिके दाखवली. तसेच राज्यभर अनेक हिंदु नववर्ष शोभायात्रांमध्ये सहभाग घेतला.

या संदर्भात महासंघाचे श्री. सुनील घनवट म्हणाले की, हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आता देशाला आवश्यकता आहे ती रामराज्याची अर्थात् ‘स्वराज्याकडून सुराज्या’कडे जाण्याची ! प्रभु श्रीरामाने सकल जनांचे कल्याण करणारे आदर्श रामराज्य स्थापन केले. तसेच आदर्श राज्य स्थापन होण्यासाठी सर्वांनी स्वतःच्या जीवनात आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्यासाठी सलग काही वर्षे प्रयत्न करावे लागतील. व्यक्तीगत जीवनात स्वतः साधना करून नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा लागेल. सामाजिक जीवनात भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांना विरोध करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे लागेल. सात्त्विक समाजाच्या पुढाकारातूनच अध्यात्मावर आधारित राष्ट्ररचना, म्हणजेच रामराज्य शक्य आहे; म्हणूनच या गुढीपाडव्यापासून व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्याचा संकल्प करूया !’