मसुरे प्रतिनिधी: जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी व त्यांच्या पूर्वतयारी साठी गुढी पाडवा प्रवेश वाढवा हा कार्यक्रम सर्व प्राथमिक शाळांत आयोजित करण्यात यावा असे आवाहन केले. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर खरारे येथून कट्टा केंद्राचा ‘गुढी पाडवा प्रवेश वाढवा’ शुभारंभ करण्यात आला.
आकर्षक रांगोळी घालून आणि मान्यवरांच्या हस्ते औक्षण करून नवीन दिवशी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाल्यानंतर तसेच मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष असे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापिका श्रीमती शितल परूळेकर यांनी शाळेचे स्पर्धा परीक्षा उपक्रम गुढीपाडवा प्रवेश वाढवा कार्यक्रमाची आवश्यकता तसेच या कार्यक्रमाबद्दल आपल्या शाळेची पार्श्वभूमी, दाखलपात्र विद्यार्थी, तसेच या कार्यक्रमानंतर आपण नवीन विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले नियोजन, नवीन विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी तयारी इत्यादी बाबत माहिती दिली. जिल्हा परिषद प्राथममिक शाळा पेंडूर खरारे मध्ये २०२३-२४ मध्ये घेतले गेलेले वर्षभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम व शाळेचे यशस्वी झालेले उपक्रम याबाबत माहिती दिली.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित एपीजे अब्दुल कलाम टॅलेंट सर्च परीक्षा, एसटीएस परीक्षा, बीडीएस परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यात यश मिळविणाऱ्या तसेच ज्ञानी मी होणाऱ स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम आलेल्या व जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शाळेच्या संघाचे बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत राज्यात आठवा क्रमांक प्राप्त केलेले शाळेचे शिक्षक श्री गणेश नाईक यांचेही अभिनंदन करण्यात आले.
मान्यवरांच्या मनोगतामध्ये विषयतज्ज्ञ आरती कांबळी यांनी ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा‘ या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल शाळेला शुभेच्छा दिल्या. तसेच निपुण मातांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विषय तज्ञ गौरी नार्वेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेच्या दोन्ही शिक्षकांच्या उपक्रमशीलतेबद्दल व शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल कौतुक करून सर्व पालकांना विद्यार्थी विकासाची खात्री दिली. आज आयोजित गुढीपाडवा प्रवेश वाढवा या कार्यक्रमाबद्दल त्यांनी आपण गौरौद्गार काढले. १००% दाखलपत्र विद्यार्थी दाखल केल्याबद्दल अभिनंदन केले. त्याच प्रमाणे व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा अपेक्षा पेंडूरकर यांनी वर्षभरातील शाळेच्या नवनवीन यशस्वी उपक्रमाबद्दल शाळेचे, मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे आभार मानले व सर्व पालकांना शिक्षक आणि शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये आदरणीय केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत सर यांनी एपीजे अब्दुल कलाम परीक्षेतील जिल्हास्तरीय यशाबद्दल शाळेचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच विविध सहा परीक्षांमध्ये शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी शाळेचे अभिनंदन केले. अवघी नऊ पटसंख्या असतानाही स्पर्धा परीक्षेत शाळेचे यश तसेच शाळेत राबविलेल्या अनेक उपक्रमाबद्दल कौतुक केले. तसेच गुढीपाडवा प्रवेश वाढवा या कार्यक्रमाचा कट्टा केंद्र चा शुभारंभ या शाळेतून होत असल्यामुळे आपणास अत्यंत आनंद होत आहे तसेच या शाळेतून अन्य शाळा या शाळेच्या उपक्रमांची प्रेरणा घेतील आणि ही शाळा उपक्रमशीलतेचे केंद्र होईल अशा पद्धतीचे मनोगत व्यक्त केले.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नाईक यांनी तर प्रास्ताविक व आभार शीतल परुळेकर यांनी मानले. सदरच्या कार्यक्रमाला कट्टा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीकृष्ण सावंत, मालवण बीआरसीच्या विषयतज्ञ गौरी नार्वेकर, आरती कांबळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुहास साटम, उपाध्यक्षा अपेक्षा पेंडूरकर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताई, तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ, नवीन विद्यार्थ्यांचे पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.