Home Uncategorized आई कुठे काय करते..!

आई कुठे काय करते..!

286

‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते‘ या लोकप्रियतेच्या शिखरावरील मालिकेतील आत्ताच्याच एका ट्विस्टने लाखो दर्शकांचा तीळपापड केला. मायाजाल वापरकर्ते अर्थात ‘नेटकरी’ एवढ्या कमालीचे संतापले की त्यांनी ही मालिका बंद करा, असा घोषाच लावला आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, करीत आहेत.. पण मालिका मात्र सुरूच आहे. !!

 

वेगवेगळ्या वाहिनींच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या मराठी मालिका लाखो कुटुंबांचे मनोरंजन करतात. या मालिका , मालिकांमधील पात्रे या कुटुंबांचाच एक भाग होऊन गेलेल्या असतात. महत्त्वाचे म्हणजे नकळतपणे या मालिका समाजात प्रबोधनाचे, संदेश देण्याचे काम करतात. मोठ्या संख्येतील जनसमुदाय खिळवून ठेवण्याचे काम या मालिकांकडून होते. हे फार मोठे सामर्थ्य आहे. त्यामुळे एका अर्थाने या मालिकांकडे समाजाला देण्याची फार मोठी जबाबदारी असते. पण या मालिका ती जबाबदारी पार पाडतात का, हा प्रश्न आहे.

 

मालिकेचा ढाचा काही बदलत नाही !

कोणतीही मालिका खलनायक किंवा खलनायिकेशिवाय नसते. अपवादाच्या संख्येत अशा मालिका असतील, ज्यात केवळ सकारात्मकता दाखविली जाते. एकमेकांच्या कुरघोडी, कळलावीचे प्रकार, संशय अशा गोष्टी सातत्याने घडत असतात. या गोष्टी दाखवून निर्मात्यांना समाजात कोणता संदेश द्यायचा असतो, हे अनाकलनीय आहे. आता माणसे समाजमाध्यमांवरुन मोकळेपणाने व्यक्त होऊ लागली आहेत. आपल्या भावना थेट मांडत आहेत. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सरळसरळ ही मालिका बंद करण्यास सांगत आहेत. या मालिकेचा टीआरपीसुद्धा घसरला आहे. ज्यांच्या मनोरंजनासाठी या मालिका दाखविल्या जातात, तोच वर्ग कंटाळून मालिका बंद करण्यास सांगत असूनही त्या माथी मारण्याचे काम का केले जात आहे?

 

प्रत्येक कुटुंबातील आईची ही कथा आहे, हे वेगळे सांगायला नको. मालिकेतील अरुंधती ही प्रत्येकाला आपलीशी वाटू लागली होती. तिच्यात आईचे प्रतिबिंबच दिसत होते. एकूणच, कुटुंब, नातेसंबंध, सणवार दाखविणारी ही मालिका अनेकांच्या मनात घर करुन राहिली होती. म्हणताना पुढे पुढे ही मालिका काही अजबगजब वळणे (ट्विस्ट) घेऊ लागली. ती पाहिल्यावर हे असे का ? हे घडविणे गरजेचे होते का ? असे प्रश्न दर्शकांना न पडले तर नवल ! पण बदलत्या काळानुरुप या गोष्टी घडतात. त्या स्वीकारायला हव्यात अशी मनाची समजूत घालून मालिकेतील प्रत्येक वळण दर्शकांनी स्वीकारले. निर्माते-दिग्दर्शक तसेच वाहिनीलाही हे अंगवळणी पडले बहुधा ! त्यांनी त्यांचा हेका सोडला नाही.. आणि आता मालिकेतील एक सकारात्मक भूमिकाच कायमची निपटून टाकली. कुटुंबातील संकटांमध्ये खंबीरपणे, शांतपणे त्यातून मार्ग काढणारी, उत्तम वागण्याने समाजाला चांगला संदेश देणारी व्यक्तिरेखा काढून टाकावी, असे यांना का वाटले? या निर्णयातून त्यांना काय दाखवायचे आहे ? मुळात, अरुंधती हे पात्र सक्षम गृहिणीचे आहे. ही एक सुशिक्षित आणि खंबीर व्यक्तिरेखा आहे. पतीचे दुसऱ्या स्त्रीवरील असलेले प्रेम पाहून ती हादरते. तिच्या एकनिष्ठ आयुष्यातील हे वादळ असते. पण त्यातूनही स्वत:ला सावरते. अशा नवऱ्यापासून मनाने ती पार विलग होते.. अशा स्त्रीच्या आयुष्यात तिच्यावर निस्सीम प्रेम करणारा जोडीदार आणावा, असे या मालिकाकर्त्यांना वाटले. इथपर्यंत ठीक आहे.. त्यामागचे कारण अरुंधतीच्या अर्थात कुटुंबासाठीच जगणाऱ्या आईच्या आयुष्यात आनंद आणावा, हा यामागील उद्देश होता.. मग आता पुढे काय? जर आईला रडवायचेच होते तर तिला नव्या नातेबंधात अडकवण्याचे कारणच काय होते? एवढा सगळा खटाटोप करुन मालिकाकर्त्यांना आईच्या आयुष्यात आनंद पेरता आला नाही, ते वेगळेच ! सासू आई झाली हे दाखवायचे होते तर आधीच्या काही भागांमध्ये आशुतोष ही व्यक्तिरेखा असतानाही आपल्या मुलाला अनिरुद्धला अरुंधतीला परत आणण्याचा सल्ला ती सासू का देत होती ? तर निव्वळ ‘समृध्दी’ बंगल्यांचा विस्कळीतपणा पुन्हा नीट करण्यासाठी ! तेव्हा ही सासू अरुंधतीच्या अर्थात आईच्या आनंदाचा विचार करताना दिसली नाही. अनेक प्रश्न आहेत. अर्थात, ही काल्पनिक गोष्ट आहे. पण म्हणून समाजात काहीही पसरविणे आजचा सुज्ञ समाजच मान्य करणार नाही.

‘आई कुठे काय करते ‘या मालिकेने गृहिणीची बाजू समाजाला दाखविली. कुटुंबातील प्रत्येकासाठी झिजणाऱ्या या व्यक्तीवर मात्र कुटुंबात अन्याय होत असतो, तिच्याकडे दुर्लक्ष केला जातो, हे दाखविले गेले. या मालिकेचा विषयच वेगळा आणि गरजेचाही होता. गृहिणीची घरातील किंमत आणि तिची प्रतिष्ठा दाखवून दिली गेली. त्याचवेळी नोकरी करणाऱ्या संजना या व्यक्तिरेखेद्वारे स्वावलंबी, स्पष्टवक्ती, व्यवसायाशी चोख असणारी आणि आजच्या आधुनिक काळाचे प्रतिनिधीत्व करणारी स्त्री दाखविण्यात आली.

 

काय चाललंय ?

या मालिका कुठे घेऊन चालल्यात ? चांगल्या पदावर नोकरी करणारी सुशिक्षित मुलगी संसार सांभाळण्यासाठी नोकरी सोडते. घरच्या प्रत्येकाची सेवा करते. याला हे मालिकाकर्ते ‘त्याग’ म्हणतात. अहो, आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहत आहोत. मुली शिकून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. स्त्री चूल आणि मूल सांभाळणारी असावी, असे या मालिका सांगत आहेत. नोकरी करणाऱ्या स्त्रिया कुटुंब, नातेसंबंध उत्तमपणे सांभाळतात. मुळात प्रत्येक स्त्री ही गृहिणीच असते, हे लक्षात घ्यायला हवे. नोकरीधंदा सांभाळून ती घरही सांभाळते. देशाच्या उत्पन्नवाढीस स्त्रिया हातभार लावत असतात. हेसुद्धा दाखवायला हवे.

 

मालिकांचे विषय

समाजात भाष्य करण्यासाठी अनेक विषय आहेत. कुटुंबातील प्रत्येकाच्या मागून धावणारी, प्रत्येकाची काळजी घेणारी, स्वत:ची नोकरी सोडणारी, स्वत:कडे दुर्लक्ष करुन इतरांना हवे-नको ते पाहणारी, नवऱ्याच्या मिळकतीवर अवलंबून असणारी, केवळ आणि केवळ घरातील कामे आणि स्वयंपाकातच अडकून राहणारी स्त्री अनेक मालिका दाखवत आहेत. तो काळ आता राहिला नाही. असता तर आज महिला इस्रोसारख्या ठिकाणी शास्त्रज्ञ नसत्या, वैमानिक नसत्या, सैनिक नसत्या, डॉक्टर्स नसत्या.. खूप खूप काही नसत्या.. पण त्यांच्या सुदैवाने त्यांनी प्रगती साध्य केली आहे. काही स्त्रिया वाईट परिस्थितीत कुढत असतील तर त्यांच्यासमोर अशा स्वावलंबी स्त्रियांचे आदर्श मालिकांच्या रुपातून ठेवले गेले पाहिजेत. एखादी स्त्री स्वत:हून आवडीने घरचे गृहिणीपद सांभाळते, तेव्हा ते कौतुकास्पदच आहे. ती तिच्या जागी श्रेष्ठच आहे. हे न्यायालयानेसद्धा अधोरेखित केले आहे. पण म्हणून प्रत्येक स्त्रीने तसेच करायला हवे, ही अवास्तव अपेक्षा दाखवू नये. मालिकांनी ठराविक साचेबद्ध विषयांच्या चौकटीतून बाहेर पडणे काळाचीच गरज आहे. कारण या मालिका अप्रत्यक्षपणे फार मोठ्या प्रमाणात समाजाचे प्रबोधन करीत आहेत. समाजाला संदेश देत आहेत. मालिका माथी मारण्याचे काम करु नये.. आणि सकारात्मक दाखवावे. चांगले दाखवावे.

 

अर्थात्, ही सगळी प्रतिभावंत माणसेच आहेत. त्यामुळे सुज्ञास अधिक सांगणे न लगे !

 

लेखिका: सौ. मंगल नाईक-जोशी