Home स्टोरी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २चा चेहरा मोहरा पालटणार

सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २चा चेहरा मोहरा पालटणार

130

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसह कारागृहात विविध आधुनिक सोयी सुविधांसाठी शासनाच्या विविध योजनांमधून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून या कारागृहाचा चेहरा मोहरा पालटणार आहे. तत्पूर्वी या कारागृहात अद्ययावत प्रवेशद्वार, व्हिडिओ कॉलिंग, डॅशबोर्ड, व्ही सी युनिट्स या अत्याधुनिक सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे हे कारागृह हायटेक बनले आहे. कारागृहातील बंदिवानही समाजाचाच एक भाग असल्याची जाणीव ठेवत शासनाच्यावतीने कारागृहात या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे कारागृहाचे अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी सांगितले.

यावेळी कारागृहाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याहस्ते करण्यात आले तर व्हिडिओ कॉलिंग, डॅशबोर्ड व व्हीसी युनिट्सचे उद्घाटन पोरस जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एच बी गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ओरोस जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र २ च्या न्यायाधीश श्रीम. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीम. कुरणे, सावंतवाडीचे प्रांताधिकारी श्री निकम, पोलीस उपअधीक्षक श्रीम. गावडे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता वैभव सगरे, कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे, तुरुंग अधिकारी संजय मयेकर, सुभेदार श्री शेटे, श्री गवस, हवालदार श्री सुर्वे, कर्मचारी श्री सागर सपाटे, मोईज शेख श्रीम सोनाली आघाव, हनुमंत माने, श्रीम. सिद्धी गावडे आदी कारागृह कर्मचारी उपस्थित होते.

   राज्य कारागृह व सुधार सेवाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अभिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संपूर्ण लाकडी छताऐवजी लोखंडी पत्र्याच्या छताच्या नूतनीकरणसाठी शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासाठी दोन कोटी ४६ लाख ५६ हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कारागृहाच्या मुख्य संरक्षण भिंतीची उंची वाढवणे कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३९ लाख ८० हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली. तसेच कारागृहात संपूर्ण विद्युत संच मांडणी व लाईट फिटिंग, फॅन यासाठी १० लाख ४० हजार रुपये प्रशासकीय मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याबाबत मार्फत याकामाची तात्काळ पूर्तता करण्यात येणार आहे.

 

कारागृह प्रशासनाचे कौतुक!

 

यावेळी जिल्हास्तरीय पायाभूत सुविधा मूल्यांकन समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हा कारागृह न्यायाधीश एच बी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. तसेच कारागृह अभीविक्षक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी मीटिंग झाली. तत्पूर्वी या कारागृहातील सर्व सुविधा व कामकाजाची पाहणी करण्यात आली. याबाबत समाधान व्यक्त करून उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजाबाबत कारागृहाच्या प्रशासनाच्या कामाचे जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि जिल्हा सत्र न्यायाधीश एच बी गायकवाड यांनी कौतुक केले.

  यावेळी कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी कारागृहातील प्रलंबित सोयींसाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे लक्ष वेधताच त्यांनी जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ मधुन कारागृहासाठी ॲम्बुलन्स, स्वयंपाक गृह नूतनीकरण, कारागृहातील बंदीवानांच्या बराकचे दरवाजे व शौचालयाचे दरवाजे नवीन बसविणे, बराकमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या बसवणे, सीसीटीव्ही बसविणे आदी कामाबाबत कारागृहाचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे यांना दिल्या.

 राज्य कारागृहाच्या पुणे मुख्यालय व मुंबई उप मुख्यालय यांच्याकडून सावंतवाडी जिल्हा कारागृहास सहा व्ही सि युनिट देण्यात आले असून आरोपींना न्यायालयात हजर न करता या व्हीसीमार्फत आरोपींना न्यायालयात ऑनलाइन उपस्थित ठेवण्यात येणार आहे. तसेच बंदीवानाना आठवड्यातून एकदा या व्हीसीद्वारे नातेवाईक तसेच वकिलांशी ऑनलाईन संवाद साधता येणार आहे. तसेच बंदीवानाना वैयक्तिक खर्चाने आठवड्यातून दोन वेळा दहा मिनिटे दूरध्वनीद्वारे नातेवाईकांशी बोलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कारागृह मुख्यालयाकडून ई किओस मशीन प्राप्त झाले असून त्याद्वारे बंदिवानांची दोन्ही वेळची हजेरी बायोमेट्रिकद्वारे घेण्यात येते

     तसेच या मशीनमध्ये कारागृहामध्ये दाखल असलेल्या सर्व बंदीवानांची न्यायालयाची माहिती तसेच त्यांचे फोटो, फिंगर प्रिंट व खाजगी रकमेची माहिती भरण्यात आली असुन सध्या या कारागृहात ५६ पुरुष आणि २२ महिला अशी एकूण ७८ बंदिवानांची क्षमता आहे. सध्या या कारागृहात ४९ पुरुष आणि ४ महिला मिळून एकूण ५३ बंदिवान आहेत. तसेच राज्य कारागृह विभागामार्फत मार्फत या कारागृहाला सहा टीव्ही संच, एक वॉशिंग मशीन, किओस्क, वॉटर कुलर, वॉटर प्युरिफायर लवकरच प्राप्त होणार असून हे कारागृह हायटेक बनले असल्याची माहिती कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी दिली.