Home स्टोरी दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र ची सिंधुदुर्ग मधील शाळांना डिजिटल भेट..!

दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र ची सिंधुदुर्ग मधील शाळांना डिजिटल भेट..!

101

३० शाळांना पटसंख्येनुसार ६० लॅपटॉपचे वाटप करत संस्थेचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट यशस्वी संपन्न*

मसुरे प्रतिनिधी: दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था गेली 16 वर्ष महाराष्ट्र राज्यातील अपरिचित गडकोटांच्या संवर्धनासाठी कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामगड व भगवंतगड किल्ल्यावर संस्थेचे कार्य चालते. गडकोट संवर्धनासोबत विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संस्थेच्या मार्फत राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून CSR प्रोजेक्ट अंतर्गत मॉर्निंग स्टार कंपनीच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यातील गडघे-यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने लॅपटॉप वाटप सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लॅपटॉप मागणी केलेल्या ३० शाळांना त्यांच्या पटसंख्येनुसार ६० लॅपटॉप चे वितरण सोमवार दि. ११ मार्च रोजी मालवण तालुक्यातील रामगड हायस्कूल येथे करण्यात आले.

यावेळी दुर्गवीर प्रमुख श्री. संतोष हासुरकर यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या कार्याची माहिती देत दुर्गवीर प्रतिष्ठान सोबत गडकिल्ले संवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुलांना मोठ्या संख्येने लॅपटॉप करण्यामागचा हेतू हाच आहे की ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक साहित्य उपलब्ध व्हावे जेणेकरून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल आणि भावी पिढी डिजिटली साक्षर होण्यास मदत होईल, असे मत श्री. हासुरकर यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षकांच्या वतीने दुर्गवीरप्रमुख श्री. संतोष हासुरकर यांच्या सह इतर दुर्गवीरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर रामगड सरपंच श्री. शुभम मठकर,दुर्गवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. संतोष हासुरकर, श्री.अभय प्रभुदेसाई, रामगड हायस्कूल चे श्री. वळंजू सर, रामगड शाळा संस्था उपाध्यक्ष श्री.सुभाष तळवडेकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे सर, दुर्गवीर सचिव श्री.सागर टक्के, खजिनदार श्री. सुरेश उंदरे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. अर्जुन दळवी, रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत डिंगणकर, दुर्गवीर सदस्य श्री. महेश सावंत, प्रमोद डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान च्या सिंधुदुर्ग विभागातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.