Home स्टोरी मसुरे देऊळवाडा शाळा तालुक्यात प्रथम…! मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान.

मसुरे देऊळवाडा शाळा तालुक्यात प्रथम…! मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान.

327

मसुरे प्रतिनिधी:  राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मसुरे देऊळवाडा या शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, प्रशासकीय नियोजन, लोकसहभाग, कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणे, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास इत्यादी घटकांमध्ये उत्तम कामगिरी करत मालवण तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या शाळेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोख तीन लाख रुपये पारितोषिक व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे मूल्यमापन गटविकास अधिकारी श्री. आत्मज मोरे, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय माने यांच्या समितीने केले. यावेळी प्रशालेत राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

तालुकास्तरीय मूल्यमापनानंतर या शाळेचे जिल्हास्तरीय मूल्यमापन शिक्षणाधिकारी प्राथमिक व डायट सिंधुदुर्ग यांच्या मूल्यमापन समितीने केले. या अभियानाच्या यशस्वीततेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, सेवाभावी संस्था, शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी, ग्रामपंचायत देऊळवाडा खेरवंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शाळेच्य या उत्तुंग यशाबद्दल मालवण तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री. संजय माने, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य श्री. महेश बागवे, सरपंच श्रीम. सुरेखा वायंगणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, उपाध्यक्षा सौ. विद्या लाकम, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.