कणकवली: येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी कोकण इतिहास परिषदेच्या १३व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि.ल.धारूरकर यांची निवड झाली आहे.
वेरूळ येथील जैन लेण्या आणि मूर्ती विज्ञान, दक्षिण भारतातील सिंधू संस्कृतीचे अवशेष, जैन धर्म, दायमाबाद येथील प्राचीन संस्कृतीचा शोध अशा विविध ऐतिहासिक विषयावरील त्यांचे संशोधन जगभरात प्रसिद्ध आहे.
काही काळ इतिहासाचे प्राध्यापक, अभ्यासक व नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर येथे वृत्तपत्र विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते.अलीकडेच त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
१९७६ ते १९८० या काळात भारतीय पुरातत्व विभागात कार्यरत छत्रपती संभाजी नगर येथील बीबी का मकबरा यावर सखोल संशोधन केले.तसेच धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यात भारतीय सिंधू संस्कृतीचे अवशेष शोधून काढण्याचे बहुमोल काम त्यांनी केले. तर नगर जिल्ह्यातही याच काळातल्या उत्खननात सिंधू संस्कृतीतील ब्राँझ रथ त्यांना आढळला होता.
डॉ.वि.ल.धारूरकर १९७५ ते ८५ अशी सलग दहा वर्षे जैन धर्मावर संशोधन करीत होते. अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, चीन, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशात त्यांच्या संशोधन कर्याची दखल घेतली जाते
डॉ.वि.ल. धारूरकर यांच्या रूपाने एक अभ्यासू विचारवंत या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी लाभले असून या वेळी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर, कार्यवाह डॉ. विद्या प्रभू, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजू व संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२८ जानेवारी २०२४ पर्यंत पाठवावेत..!
परिषदेत सहभागी होण्यासाठी अभ्यासक व प्राध्यापकांनी प्राचीन ,मध्ययुगीन व आधुनिक या विभागातील आपले शोध निबंध २८ जानेवारी २०२४ पर्यंत पाठवावेत असे आवाहन प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, परिषद समन्वयक डॉ. सोमनाथ कदम, डॉ.बाळकृष्ण गावडे, डॉ. राजेंद्र मुंबरकर डॉ.मारोती चव्हाण, प्रा. सचिन दर्पे व डॉ. तेजस जयकर यांनी केले आहे.







