Home शिक्षण एस.पी.के महाविद्यालयात २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कार्यशाळा.

एस.पी.के महाविद्यालयात २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कार्यशाळा.

107

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन.

 

सावंतवाडी: मुंबई विद्यापीठ सलग्नित अनुदानित व विनाअनुदानित पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांच्या प्राचार्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कार्यशाळेचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे बुधवार दि २४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेमध्ये करण्यात आलेले आहे.

 

दुपारी २ ते ३ या वेळेमध्ये महाविद्यालयांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालये व माध्यमिक विद्यालयांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी सर्व

अकृषी विद्यापीठ स्तरावर व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५  पासून सर्व अकृषी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम आराखड्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या धोरणांची अंमलबजावणी करत असताना पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षापासून उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि अमुलाग्र व्यापक बदलांचा सर्वाधिक परिणाम शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५  मध्ये कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर होणार आहे .त्या अनुषंघाने विद्यार्थी केंद्री शिक्षण धोरणांची मूलभूत तत्वे परिणामकारकरीत्या प्रत्यक्षात आणायची असतील तर ती या वर्षाच्या बारावीच्या विद्यार्थ्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचणे गरजेचे आहे .पदवी महाविद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांकरिता या बदलांची माहिती विस्तृतपणे निवेदित करण्यासाठी स्कूल कनेक्ट संदर्भामध्ये या कार्यशाळेचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे करण्यात आलेले आहे.

या कार्यशाळेमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांकरिता सकाळी ११ ते १ व कनिष्ठ महाविद्यालयांकरिता दुपारी २ ते ३ या वेळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यशाळेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्राचार्यांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.