Home स्टोरी स्वक्षमता ओळखून करिअरची निवड केल्यास यश निश्चित मिळेल…! – प्रा. रुपेश पाटील.

स्वक्षमता ओळखून करिअरची निवड केल्यास यश निश्चित मिळेल…! – प्रा. रुपेश पाटील.

136

चौकुळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व्याख्यान संपन्न.

व्याख्यानात सहभागी विध्यार्थी

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमान आहेत. आपला माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल राज्यात सर्वोत्तम आहे. मात्र असे असतानाही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश समाधानकारक नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांची जाणीव असतानाही ते करिअर निवडताना घोडचूक करतात, म्हणून आपल्या क्षमतांना ओळखून योग्य करिअर निवडल्यास यश हमखास प्राप्त करता येते, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘दहावीनंतर करिअरच्या वाटा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम बोडके उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास रुपेश मोरजकर, नरसिंह गुरव, सहाय्यक शिक्षिका रसिका मलजी, कीर्ती गावडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र पारितोषिक प्रदान करण्यात आले. सदर पारितोषिक कै. अनुसया विठोबा बोडके यांच्या स्मरणार्थ सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम बोडके यांनी प्रायोजित केले. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धातील यशवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.

दरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर विद्यालयातील दीक्षा परब, अनुष्का कानसे, शरयू गावडे, मृणाली परब, जान्हवी गावडे, श्रेया गावडे, सूरज गावडे यांनी आपल्या वक्तृत्व कलेतून दोन्हीही महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

 

यानंतर प्रमुख वक्ते प्रा. रुपेश पाटील यांनी ‘दहावी व बारावीनंतरच्या विविध करिअरच्या वाटा’ विस्तृत व अभ्यासपूर्ण समजावून सांगितल्या. यात त्यांनी दहावीनंतरचे विविध अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रम यांची सविस्तर माहिती दिली. आपल्या व्याख्यानात प्रा. पाटील पुढे म्हणाले, आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून नावारूपास आला पाहिजे. त्यासाठी येथील प्रचंड गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी. यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक संजय पाटील यांनी केले.

 

आपल्या अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक संजय पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते. मात्र केवळ मार्गदर्शनाअभावी ते कुठेतरी कमी पडतात. म्हणून आगामी काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध प्रकारच्या करिअरच्या संधी याबद्दल मान्यवरांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राध्यापक रुपेश पाटील यांचेही व्याख्यान आयोजित केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रसिका मलजी यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक नरसिंह गुरव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुपेश मोरजकर, कीर्ती गावडे यांनी विशेष मेहनत घेतली.