Home स्टोरी डॉ. शेटे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिणेतील दिग्विजय’ या विषयावर आयोजित व्याख्यानाला...

डॉ. शेटे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिणेतील दिग्विजय’ या विषयावर आयोजित व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद….!

135

सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती. या मोहिमेत दक्षिणेतील हिंदुंना दिलासा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. महाराष्ट्रातील राजा आपल्या रक्षणासाठी दक्षिणेत आल्याचा विश्वास तामिळ, तेलगू, आंध्रमधील हिंदुंमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज योद्धेच नव्हे, तर धर्मरक्षकही होते, असे प्रतिपादन शिवचरित्रकार व हिंदवी परिवार महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी येथे केले.

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे येथील राजवाडÎात डॉ. शेटे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिणेतील दिग्विजय’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी संस्थानचे लखम सावंत-भोसले, श्रद्धाराजे भोसले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, वीज वितरण कंपनीचे निवृत्त उपअभियंता सोमनाथ जिगजिन्नी उपस्थित होते. डॉ. शेटे यांचे व्याख्यानो सातवे पुष्प होते.

डॉ. शेटे यांनी आपल्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेचे ओघवत्या शैलीत विवेचन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. मोगलाईच्या विरोधात उभे राहिलेले हे हिंदवी स्वराज्याचे तख्त होते. औरंगजेबाच्या विरोधात उभे राहण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्याच्या नजरेला नजर मिडविण्यी कुणाची हिंमत नव्हती. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे तख्त उभे केले, ही एक अद्वितीय घटना होती.

राज्याभिषेक झाल्यानंतर क्षत्रियांनी क्षात्रतेज दाखवण्यासाठी दिग्विजय मोहीम काढावी, अशी हिंदुस्तानची परंपरा रघु रामचंद्रांपासून सुरू झाली होती. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे सुरू ठेवण्यासाठी दिग्विजय मोहीम दक्षिणेत सुरू केली. या दरम्यान ते साताऱयात होते. ते तीन महिने आजारी पडले होते. याबाबत अफवा पसरल्या होत्या. परंतु त्यातून सावरून शिवाजी महाराजांनी दिग्विजय मोहीम आखली. या काळात दक्षिणेकडून रघुनाथपंत हनुमंते शिवाजी महाराजांना भेटले. हे रघुनाथपंत हनुमंते शहाजी महाराजांच्या दरबारात असलेल्या नारो हनुमंते यांचे पुत्र. दक्षिण भारतात असलेल्या मोघलांया विरोधात आघाडी उघडावी, यासाठी ही भेट घेतली. कुतुबशहा यासाठी मदत करेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मोहीम हाती घेण्यात आली. मोहीम हाती घेण्यामागे राज्याभिषेकाचा खर्च वसूल करावा हा हेतू होता. त्या काळात मुलखावर हल्ला करून खर्च वसूल करणे नैतिक मानले जात असे. राज्याभिषेकासाठी 1 कोटी 42 लाख खर्च आला होता. जगाला आपली ताकद दाखवण्यासाठी ही मोहीम गरजेची होती. जगन्नाथ सरकार यांच्या बखरीमध्ये तसा उल्लेख आहे. तर कृष्ण अनंत सभासद यांच्या बखरीमध्ये दोन पुत्रांसाठी शिवाजी महाराजांनी दिग्विजय मोहीम आखली होती. त्यानुसार दक्षिणेकडचे राज्य शूर असलेल्या संभाजी महाराजांना तर महाराष्ट्रातील राज्य राजाराम महाराजांना देण्याचा हेतू होता, असे बखरकार म्हणतात. तर डॉ. बी. मुद्याचारी यांच्या ‘मराठा आणि म्हैसूर एम्पायर’ या पुस्तकानुसार शहाजीराजांचे पुत्र व्यंकोजी भोसले बेंगळूरमध्ये होते. ते शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ. त्यांनी बेंगळूरहून राजधानी तंजावरला हलवली. तेथेच घात झाला. तेथील नायक उठून उभे राहिले. आपल्या वडिलांनी मिळविलेले राज्य सावत्र भावाकडून राखले जात नाही म्हणून आणि या राज्यातील संपत्तीचा वाटा मिळावा, यासाठी ही मोहीम आखल्याचे म्हणतात. ही मोहीम आखताना महाराजांनी कोकणातून दक्षिणेत प्रवेश केला. पाटगाव येथे मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्यासोबत 20 हजार घोडेस्वार आणि 30 हजार पायदळ असे 50 हजार सैन्य होते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अनेक सरदारांनी या मोहिमेत भाग घेतला होता. महाराजांनी दक्षिणेत जानेवारी 1677 मध्ये कोफ्पळ किल्ला ताब्यात घेऊन दक्षिणेतील विजयाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे दक्षिणेतील राजे राजवाडे, नायक बिथरले होते. दक्षिणेतील हिंदुंना मोगलांकडून त्रास होत होता. अशावेळी महाराजांनी दक्षिण दिग्विजियाची मोहीम आखल्याने दक्षिणेतील हिंदुंना दिलासा मिळाला होता.

तामिळ, तेलगू, आंध्रच्या जनतेला महाराजांबद्दल विश्वास वाटला. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडील जिंजी, वेल्लूर असे किल्ले ताब्यात घेतले. दक्षिणेकडच्या मोहिमेत युद्धाबरोबर अध्यात्मिकतेची जोड होती. चेन्नई येथे कालिकंबल जागृत देवस्थान आहे. तेथील गोपुरावर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. शिवाजी महाराजांचा देवतांच्या पंक्तीत तामिळनाडूतील लोकांनी समावेश केला. त्यामुळे शिवाजी महाराज महान आणि युगपुरुष होते, हे लक्षात येते.

दक्षिणेतील दिग्विजय मोहीम यशस्वीरित्या पार पडली होती. येथे मराठÎांच्या छावण्या काही ठिकाणी होत्या. महाराज पुन्हा महाराष्ट्रात परतले. सकोजीरावांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत असताना धारवाड जिह्यातील बेळवाडी येथील किल्ल्यावर गाई आणि बैलावरून तेथील गडीवरील ईश प्रभूदेसाई यांच्याबरोबर मराठÎांचे युद्ध झाले. त्यात प्रभूदेसाई ठार झाले. त्यानंतर त्यांची पत्नी मल्लमा यांनी मराठÎांशी झुंज दिली. त्यांना मराठÎांनी कैद केले. विजयाच्या उन्मादात हे कृत्य घडले. बेळवाडी मराठÎांच्या ताब्यात आली. ही घटना शिवाजी महाराजांना कळली. महिली मानखंडना झाली. हे समजताच महाराज स्वत तेथे आले. त्यांनी सकोजीरावांचे डोळे काढून तुरुंगात कैद केले. न्याय सर्वांना हे तत्व महाराजांनी बाळगले होते आणि ते अंमलात आणले. सकोजीराव मेव्हणे असूनही त्यांना शिक्षा दिली. त्यामुळे शिवाजी महाराज न्यायी राजा होते हे स्पष्ट होते. त्यांनी मल्लमाच्या बाळासाठी तो किल्ला परत केला. महाराजांकडून झालेल्या सन्मानामुळे शिवाजी महाराजांच्या हयातीत मल्लामा यांनी शिवाजी महाराजांचे शिल्प काढले. ते आजही तेथील यादवड गावात पाहायला मिळते. शिवाजी महाराज हे स्त्रियांचा सन्मान करणारे राजे होते हे यातून दिसून येते.

शिवाजी महाराजांवर जिजाऊंचे संस्कार होते. आजच्या काळातही असे संस्कार….

प्रत्येक महिलेने आपल्या मुलावर बिंबवले पाहिजेत. आज मोबाईलमध्ये मुले अडकली आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत चिंता वाटते. पालकांनी या मुलांना बोधकथा, संस्कारकथा सांगितल्या पाहिजेत. त्यासाठी आपणही वाचन केले पाहिजे. या मुलांना यातून बाहेर काढले पाहिजे. तरच त्यांचे भवितव्य घडेल, असे डॉ. शेटे म्हणाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेची सविस्तर माहिती दिली.

यावेळी सिंधुमित्र सहयोग प्रतिष्ठानतर्फे व्यावसायिक के. के. शेट्टी, एक्स्पर्टो बेकरीचे योगेश नायर, निवृत्त उपअभियंता सोमनाथ जिगजिन्नी यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत दीपक गावकर यांनी केले.