ठिकठिकाणी सुहासिनींकडून औक्षण : राम नामाने परिसर दुमदुमला.
वेंगुर्ला प्रतिनिधी: तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने ‘श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभा यात्रा आज सोमवारी शहरातून काढण्यात आली. या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शेकडो रामभक्त व हिदूधर्माभिमानी पारंपरिक वेशात सहभाही झाले होते. यात्रेत रामनामाचा गजर करण्यात आला. तसेच ठिकठिकाणी सुहासिनींकडून झालेले औक्षण आणि राम नामाने परिसर दुमदुमला होता.
वेंगुर्ले येथील या मोटरसायकल शोभायात्रेच्या प्रारंभी ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात देवस्थान मानक-यांच्या हस्ते मंगलकलशाची विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मंगलकलश पालखीमध्ये ठेऊन मोटरसायकल रॅलीने यात्रेला प्रारंभ झाला. ही रॅली रामेश्वर मंदिर, शिरोडा नाका, कलानगर, मांडवी, दाभोसवाडा, जुना एस.टी.स्टॅण्ड, दाभोली नाका, बाजारपेठ, मारूती मंदिर, हॉस्पिटल नाका, भटवाडी पेट्रोल पंप, आडी स्टॉप, वरसकर स्टॉप, संत लालाजी मंदिर मठ मार्गे खांबड भटवाडी, गणपती मंदिर, डॉन्टस कॉलनी, गवळीवाडा, पॉवर हाऊस, सातेरी मंदिर, राऊळवाडा मार्गे राम मंदिर अशी काढण्यात आली.
शिरोडा नाका, दाभोसवाडा, जुना एसटी स्टॅण्ड, गिरपवाडा, दाभोली नाका, बाजारपेठ, मारूती स्टॉप, हॉस्पिटल नाका, वडाचे सांदेकर, भटवाडी, आनंदी अर्पित, वरसकर स्टॉप, संत लालाजी मंदिर, गणपती मंदिर, डॉन्टस कॉलनी, गवळीवाडा, कॅम्प कॉर्नर, सातेरी मंदिर, राऊळवाडा व राम मंदिर येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले. आज वेंगुर्लेतील परिसर भक्तीमय बनला होता.