नाशिक (प्रतिनिधी):अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गतर्फे दि. २० ते २७ डिसेंबर २०२३ या काळात श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम,जप, यज्ञ सप्ताह संपूर्ण जगभरातील सेवाकेंद्रांमध्ये साजरा केला जाणार आहे अशी माहिती सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांनी दिली तेव्हा उपस्थित सेवेकऱ्यानी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून आनंद व्यक्त केला.
श्री क्षेत्र दिंडोरी येथील प्रधान सेवाकेंद्रामध्ये रविवार दि. १७ डिसेंबर रोजी साप्ताहिक प्रश्नोत्तरे- मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. यावेळी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमपूज्य गुरुमाऊलींनी बालसंस्कार, प्रश्नोत्तरे, विवाह मंडळ, आरोग्य, वास्तूशास्त्र, कायदेशीर सल्लागार, प्रशासकीय कामकाज, दुर्ग संवर्धन, पर्यावरण, देश-विदेश अभियान आदी विभागांवर मार्गदर्शन केले. अत्यंत प्रासादिक आणि रसाळ वाणीतून संबोधित करताना गुरुमाऊली यांनी सांगितले की,गाणगापूर, पिठापूर,कुरवपूर, नृसिंहवाडी, अबू पर्वत, गिरनार या सर्वच ठिकाणी दत्त जयंती साजरी होते. श्री स्वामी सेवामार्गाच्या सर्व दत्तधामांमध्येही दत्त जयंती निमित्ताने सेवेकऱ्याना सामुदायिक गुरुचरित्र वाचण्याची अपूर्व संधी मिळणार आहे.ज्या सेवेकऱ्यांना गाणगापूर, पिठापूर,नरसोबाची वाडी, गुरुपीठ या ठिकाणी गुरुचरित्र पारायणाची सेवा करायची आहे त्यांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करावी असे त्यांनी सूचित केले. सप्ताह काळामध्ये पादत्राणे,प्रहरे, प्रसाद वाटप अशा विविध असामान्य सेवांमध्ये भाविकांनी सहभागी होऊन आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे असे ते म्हणाले.
अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची रूपरेषा स्पष्ट करतांना गुरुमाऊली श्री.मोरे म्हणाले की,मंगळवार दि. १९ डिसेंबर रोजी ग्रामदेवतांचा मानसन्मान होईल.दि. २० रोजी सप्ताहाला प्रत्यक्ष प्रारंभ होऊन देवतांची स्थापना, अग्नी स्थापना आणि हवन होईल. दि.२१ रोजी नित्य स्वाहाकारासह गणेश आणि मनोबोध याग होईल. दि. २२ रोजी सकाळ सत्रात गीताई याग आणि एकादशी निमित्त दुपारनंतर संक्षिप्त भागवत ग्रंथाचे सामुदायिक पाठ घेतले जातील. दि. २३ रोजी स्वामी याग,दि. २४ रोजी चंडियाग, दि. २५ रोजी रुद्र याग संपन्न होईल.दि.२६ रोजी दत्त जयंतीची आरती नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता न होता दुपारी बारा वाजून ३९ मिनिटांनी होईल आणि दि.२७ रोजी श्री सत्यदत्त पूजन आणि देवता विसर्जन होऊन अखंड नाम जप यज्ञाची श्रद्धापूर्वक वातावरणात सांगता होईल. अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजे आपले प्रारब्ध शुद्ध करण्याची एक नामी संधी असून या काळात विविध सेवांचे प्रशिक्षणही घेता येते. त्यामुळे जास्तीत जास्त सेवेकर्यांनी संपूर्ण जगभरातील सेवाकेंद्रांमध्ये होणाऱ्या सप्ताहात सहभागी व्हावे असे त्यांनी नमूद केले.
डिसेंबर महिन्याचा मासिक महासत्संग यावेळी सप्ताहामुळे चौथ्या शनिवारी होण्याऐवजी म्हणजे दि. २३ डिसेंबर ऐवजी दि. ३० डिसेंबर रोजी होईल असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी गुरुपुत्र आ. श्री. आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.