सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याची तक्रार तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ताराम ऊर्फ बाळा जाधव व शंकर सहदेव सावंत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या अपहाराची आपल्या स्तरावरती कसून चौकशी करून दोषींवरती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्याधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळवडे ग्रामपंचायतमध्ये पंधरा वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून तळवडे जाधववाडी विहिरीस लोखंडी रिंग बसवणे हे काम झालेले नसून सदर कामाची रक्कम परस्पर बँक खात्यातून गहाळ केली आहे. तसेच तळवडे येथील काळोबा मंदिर जवळ घाट पायऱ्या बांधणे, सदर काम झालेले नसून परस्पर रक्कम खात्यातून गहाळ करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तळवडे ग्रामपंचायत हद्दीतील विसर्जन घाट पायऱ्या बांधणे हे सुद्धा काम झालेले नसून बँक खात्यातील रक्कम गहाळ केली आहे.
अशी अनेक कामे मिळून लाखो रुपयांचा अपहार तळवडे ग्रामपंचायतमध्ये झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच तळवडे ग्रामपंचायतमध्ये अनेक कामे ज्यांचे मूल्यांकन सुद्धा झालेले नसून बँकेच्या खात्यातून अनेक रकमा काढलेल्याचा संशय असून अशा सर्व अपहाराची आपल्या स्तरावरती कसून चौकशी करावी. तसेच सदर चौकशी होत असताना तक्रारदार म्हणून आम्हाला कळवण्यात यावे जेणेकरून चौकशी कामी आम्हाला पुरावे सादर करता येतील व लेखी जबाब नोंदवता येईल. सदर चौकशी होऊन योग्य प्रकारे दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी बाळा जाधव व शंकर सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.