Home स्टोरी नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्यात्म...

नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्यात्म होय….! प्रा. रुपेश पाटील

111

कुडाळ: सर्वसाधारणपणे आपला देह मन चालवत असतो. त्यामुळे जे मनात येईल ते आपण करत असतो, ते बरोबर किंवा चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते. तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे. ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म. परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक असतात. त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्यात्म होय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील यांनी बिबवणे येथे आयोजित व्याख्यानादरम्यान केले.

 

श्री.स्वामी प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ पळसेवाडी -बिबवणे यांच्या वतीने ‘शाश्वत सुखी जीवनासाठी अध्यात्म!’ या विषयावर श्री गजानन महाराज ध्यान मंदिर येथे आयोजित प्रबोधनात्मक व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील बोलत होते.

 

प्रा. पाटील पुढे म्हणाले, परमेश्वर निर्मित सृष्टीच्या रचनेस व नियमावलीस अर्थात जन्म, मृत्यू, संकटे, आनंद, दु:ख हे सारं समजून घेणे व त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे, त्याने डोके रिकामे ठेवण्याची म्हणजे अनावश्यक गोष्टींवरवर अजिबात लक्ष न देण्याची आठवण होऊन पूर्णतः दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेण्याचे शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे श्रध्दा जागृत करणे होय. मनासारखे कोणालाच जगता येत नसते. परस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. असे सांगत प्राध्यापक पाटील यांनी अध्यात्मचे जीवनातील असलेले अनन्यसाधारण महत्व विविध उदाहरणे देऊन आपल्या व्याख्यानातून स्पष्ट करुन दिली.

 

यावेळी श्री. स्वामी प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ पळसेवाडी यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी प्रा. रुपेश पाटील यांचा भक्ती सेवा मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन नाईक यांनी तर आभार प्रदर्शन अमित वेंगुर्लेकर यांनी केले.