Home स्टोरी मुलाना माणूस म्हणून जगायला शिकवा! सौ शरयू घाडी यांचे प्रतिपादन

मुलाना माणूस म्हणून जगायला शिकवा! सौ शरयू घाडी यांचे प्रतिपादन

131

मसुरे प्रतिनिधी:

आपल्या मुलांना परीक्षार्थी न बनविता माणूस म्हणून जगायला शिकवा. परीक्षेतील गुणांकडे न बघता त्यांच्या सद्गुणांकडे बघा असा सल्ला देतानाच पालकत्व ही परीक्षा असल्याचे मत देवगड तालुक्यातील मुणगे येथील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण तज्ञ सौ. शरयू नागेश घाडी यांनी व्यक्त केले. 

गोवा राज्यातील कोणकोण श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन कला, क्रीडा भजनी मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि आंतरभारतीचे प्रमुख प्रा. पांडुरंग नाडकर्णी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. आई, वडिलांपेक्षा पालक होणे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रसाद सारख्या दिव्यांग मुलाला घडविताना आपण कसे घडत गेलो हे सांगत मुलाची सर्जनशिलता पहातानाच त्याला सतत आनंदात कसे ठेवता येईल याचा आपण व आपल्या पतीने विचार केला. घरातील परिस्थिती सामान्य असल्यामुळे दोघांनाही नोकरी करणे आवश्यक होते. त्यामुळे आपल्या पतीने सतत १८ वर्षे रात्रपाळी केली. आपला मुलगा शिकायला हुशार, गायक, चित्रकार एवढेच नसून बहुआयामी व्यक्तीमत्वाचा मुलगा होता. लाखात एखाद्यालाच होणारा असा दुर्धर रोग त्याला झाला. २० वर्षे ४ महिने ५ दिवस एवढे आयुष्य जगला असला तरी राष्ट्रीय स्तरावर तो चमकला. तीन वेळा राष्ट्रपती भवनात त्याच्यामुळे आम्हांला जाण्याची संधी मिळाली. म्हणून परमेश्वराची देणगी म्हणून आम्ही त्याचा सांभाळ केला, अशा शब्दांत आईची कथा आणि व्यथा त्यांनी सादर केली. त्यापूर्वी प्रसादच्या जीवनावरील ‘दुर्दम्य’ हा लघुपट दाखविण्यात आला. शरयू नागेश घाडी यांच्या पंखाविना भरारी’ या मराठी पुस्तकाचे प्रा. पांडुरंग नाडकर्णी यांनी कोकणी अनुवाद केलेला असून शरयू नागेश घाडी आणि नागेश घाडी यांचा यावेळी त्यांनी परिचय करून दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकविश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर उपस्थित होते. एखादी संस्था चालविताना पदाचा विचार करणे महत्वाचे नसून आपले काम महत्वाचे आहे. आपण आजवर लोकविश्वास प्रतिष्ठानमध्ये पडेल ते काम करीत आलो असल्याचे मत श्री. प्रियोळकर यांनी यावेळी व्यक्त केले. सूत्रसंचालन अभिषेक म्हाळशी यांनी तर जतीन काळे यांनी आभार मानले.