Home स्टोरी पद्मावती मठात कोजागिरी पौर्णिमेला दम्यावर मोफत औषध सेवा

पद्मावती मठात कोजागिरी पौर्णिमेला दम्यावर मोफत औषध सेवा

191

औंढा नागनाथ (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील श्री पद्मावती मंदिर व पद्मावती मठाचे मठाधिपती श्री 108 महंत डॉक्टर पद्मनाभ महाराज यांच्यातर्फे अश्विन शुद्ध पौर्णिमा तथा कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ पर्वावर उत्तर रात्री दमा म्हणजेच अस्थमा आजारावर मोफत औषध दिले जाणार आहे. शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पद्मावती मठ- मंदिरात हा उपक्रम विनामूल्य राबविण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी आदिशक्ती श्री कोल्हापूरची अंबाबाई हिचे प्रतिरूप असलेले श्री पद्मावती मातेचे मंदिर हे उपपीठ मानले जाते. याच मठ- मंदिरामध्ये मठाधिपती श्री पद्मनाभ महाराज हे दुःखी, कष्टी, पीडित, बाधित गरजू व्यक्तींसाठी सामाजिक आणि अध्यात्मिक माध्यमातून मार्गदर्शन करतात. गेल्या 23 वर्षांपासून मठाधिपती श्री पद्मनाभ महाराज दम्याच्या आजारावर मोफत दवा वाटपाची सेवा करीत आहेत. आजवर हजारो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून ते व्याधीमुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही माशांमधून हे औषध दिले जात नसून दुधापासून बनवलेल्या खिरीच्या प्रसादात हे औषध वाटप केले जाते. हा प्रसाद शुद्ध सात्विक मानला जातो. श्री पद्मावती मठ -मंदिरातील श्री पद्मानंदनाथ सच्चिदानंदनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दम्याच्या आजारावर औषध दिले जाणार आहे. या मठ- मंदिरामध्ये वर्षातून केवळ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच ही सेवा दिली जाते. याव्यतिरिक्त दरवर्षी दत्त जयंती सोहळा, नवरात्र महोत्सव व दरदिवशी महाप्रसादाचे वाटप ,ललित पंचमीच्या दिवशी 101 बालिकांचे कन्यापूजन तसेच सुवासिनी पूजन आणि सौभाग्य अलंकाराचे वाटप केले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी भंडारा केला जातो. हे स्थान अत्यंत जागृत असून आजवर हजारो भाविकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. मठाधिपती डॉक्टर पद्मनाभ महाराज हे सेवाभावी वृत्तीने समाज उद्धाराचे कार्य करीत आहेत.

येत्या शनिवारी होणाऱ्या दम्यावरील औषधाच्या वाटप सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7350855511 या क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. हे औषध विनामूल्य दिले जाणार आहे असे ट्रस्टने कळविले आहे.