Home स्टोरी टोलवसुली’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा ! – राज ठाकरे

टोलवसुली’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा ! – राज ठाकरे

100

मुंबई: आतापर्यंतच्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याच्या घोषणा वेळोवेळी दिल्या आहेत; मात्र अद्यापही राज्य टोलमुक्त झालेले नाही. टोल हे राजकारणातील अनेकांचे उदरनिवार्हाचे साधन झाले आहे. त्यांना प्रत्येक दिवसाला, आठवड्याला आणि मासाला पैसे मिळतात. ‘टोलवसुली’ हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा आहे, या शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ९ ऑक्टोबर या दिवशी राज्यात टोलवसुलीद्वारे सर्वसामान्यांच्या होणार्‍या आर्थिक लुटीवर पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. ‘टोलनाके हा काही काश्मीरप्रमाणे विषय नाही. हा विषय निकालात काढला जाऊ शकतो. सत्तेत आलेला प्रत्येक पक्ष याविषयी नवनवीन आश्‍वासने देऊन जनतेच्या तोंडाला पाने पुसतात. हे किती दिवस चालणार ? टोलनाक्यांच्या माध्यमातून सरकारला पैसे मिळतात, तर सरकार रस्त्यांवरील खड्डे का बुजवत नाही ? मग खड्डे बुजवण्याच्या कामासाठी महापालिकांमधून वेगळे कंत्राट का दिले जाते ? ’, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना राज्यातील ४४ टोलनाके बंद करण्याचे दिलेले आश्‍वासन, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आदी नेत्यांनी टोलनाके बंद करण्याविषयी केलेल्या वक्तव्यांचे व्हिडिओ पत्रकार परिषदेत दाखवले. हे व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर ‘एवढ्या थापा मारूनही याच पक्षांना लोक मतदान कसे करतात ?’ असे त्यांनी विचारले.कोणते टोलनाके बंद आहेत ?, याची खात्री करण्यासाठी मी २ दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. टोलनाके बंद झाले नसतील, तर आमची माणसे तेथे उभे रहातील. त्यांना विरोध झाला, तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. मग सरकारने काय करायचे ते करावे. टोलनाके बंद करण्यासाठी आम्ही आंदोलन चालू केले. टोलनाके चालू रहाण्यासाठी सरकारवर कुणी दबाव आणत आहे का ? असा प्रश्‍न या वेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.