Home स्टोरी झाड पडून कुडाळ-आंजिवडे येथील दोघा तरुणांच्या मृत्यूची जबाबदारी युवराज लखमराजे यांनी स्वीकारावी!...

झाड पडून कुडाळ-आंजिवडे येथील दोघा तरुणांच्या मृत्यूची जबाबदारी युवराज लखमराजे यांनी स्वीकारावी! डॉ. जयेंद्र परुळेकर

226

सावंतवाडी, ता. ४:  शहरात अंगावर झाड पडून कुडाळ-आंजिवडे येथील दोघा तरुणांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. राजवाडा परिसरातील झाड पडून घडलेल्या या घटनेची नैतिक जबाबदारी युवराज लखमराजे यांनी स्वीकारावी. भाजपमधील राजकीय वजन वापरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रत्येकी २५ लाख रुपये मिळवून द्यावेत, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले. पालिकेने नोटीस बजावूनही ते झाड न तोडणाऱ्या संबंधितावर प्रशासनाने गुन्हा का दाखल केला नाही? पालिका प्रशासन याबाबत गप्प का? झाडे तोडण्याबाबत आता पालिकेची भूमिका काय? असा प्रश्नही परुळेकर यांनी केला.

परुळेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत घेतली. परुळेकर म्हणाले, ‘‘भजनासाठी आलेल्या दोघा तरुणांचा राजवाडा परिसरात अंगावर भेडले माडाचे झाड पडून जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रकाराला जबाबदार कोण?, याची चौकशी होणे आवश्यक आहे. एक वडील म्हणून माझ्या मुलांच्या बाबतीत असा प्रकार घडला असता, तर मी गप्प बसलो नसतो. मुळात हे झाड ज्या परिसरात आहे, त्या राजवाड्याला पालिकेने नोटीस बजावली होती. तरीही ते झाड तोडलेले नाही. त्यामुळे या दोघांच्या मृत्यूची युवराज लखमराजेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी. शिवाय भाजपमधील राजकीय वजन वापरून त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दोघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये मिळवून द्यावेत; अन्यथा दोघांच्या कुटुंबांची जबाबदारी स्वतः उचलावी. प्रशासनाने नोटीस बजावूनही जर झाडे तोडत नसाल, तर लोकशाहीमध्ये भविष्यात आमदार होण्याची स्वप्ने तुम्ही कशी काय पाहू शकता? अशाने तुमचे डिपॉझिट जप्त होऊ शकते. मुळात जनतेबद्दल मनात कळवळा असणे गरजेचे आहे.’’

गुन्हा का दाखल केला नाही?

परुळेकर पुढे म्हणाले, ‘‘त्या परिसरात व्यवसाय करणाऱ्या टेम्पोचालकांकडूनही धोकादायक झाडे तोडण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती; मात्र पालिका प्रशासनाने झाडे तोडण्याबाबत हालचाली का केल्या नाहीत, हा प्रश्न आहे. या घटनेनंतर ज्यांच्या जागेत हे झाड आहे, त्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस पालिकेने का दाखवले नाही? असा प्रश्नही उपस्थित होतो.’’