Home स्टोरी प्रशासनाला कधी जाग येणार? सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांचा प्रश्न….

प्रशासनाला कधी जाग येणार? सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांचा प्रश्न….

182

सावंतवाडी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग (सावंतवाडी) हि संस्था म्हणजे राजकारणी संस्था नव्हे तर सर्व स्तरावर निस्वार्थपणे सेवाभावी काम करण्याचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे. या टीम मधला प्रत्येक जण आपला महत्त्वाचा वेळ देऊन आपण समाजाचा एक घटक म्हणून कार्यरत आहेत. शहर किंवा शहराच्या बाहेर एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस सामाजिक बांधिलकीच्या टीमला माहिती मिळतातच अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आमची टीम घटनास्थळी यंत्रसामग्री सहित पोहोचते. परंतु आमचं दुर्दैव असं की, अशा प्रकारच्या काही दुर्घटना घडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणच्या डेंजर झोन मधील घटकांचा पाठपुरावा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून प्रशासनाला वेळोवेळी निवेदनाद्वारे केला जातो. परंतु प्रशासन याकडे कान – डोळा करते आणि याचाच परिणाम काल रात्री राजवाडा येथे घडलेली दुसरी दुर्दैवी दुर्घटना आहे.

गेल्या वर्षीच्या पावसात त्याच परिसरामध्ये कोर्टाच्या बाजूचे भले मोठे झाड रस्त्यावर पडले होते. परंतु त्यावेळी सुदैवाने चौघांचा प्राण वाचला होता. अशा घटना वारंवार घडू नये म्हणून त्याच रस्त्याच्या आजूबाजूला असलेली धोकादायक झाडं तोडण्याचे निवेदन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पावसा आधी देऊन सुद्धा त्यावर योग्य कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही आणि आज भर सणासुदीच्या काळामध्ये निष्पाप 20/22 वय असलेल्या 2 मुलांचा बळी गेला. याला जबाबदार कोण? आणि अजून अशा किती बळींची वाट पाहणार? सामाजिक बांधिलकीची टीम अवघ्या दहा मिनिटांमध्ये यंत्रसामग्री घेऊन पोचली व त्या भल्या मोठ्या झाडाखाली दबलेल्या त्या दोन मुलांना झाड कटरने कट करून खूप पराकष्टाने बाहेर काढण्यात यश आलं. परंतु काही क्षणातच त्यां निष्पाप जीवांचा बळी गेला होता.

प्रशासनाच्या या निष्काळजीपणा धोरणाने अशाच प्रकारच्या दुर्घटना- अपघात घडतच राहणार. दोन दिवस घटनेचा गाजावाजा होणार त्यानंतर तसं चालत राहणार. पण यापुढे असं चालू देणार नाही. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये याचं भान प्रशासनाने ठेवावे. कारण तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि याचाच पगार तुम्हाला मिळतोय. येथे लोकांचा जीव स्वस्त नाही आहे. त्यांनाही तुमच्यासारखा परिवार आहे. त्यांनाही वेदना आहेत. त्यांचा आक्रोश जवळून पहा म्हणजे कळेल.

एरवी नियमावर बोट ठेवणारे प्रशासन अशा प्रकारच्या आपल्या चुकीच्या धोरणाचे समर्थन करणार का? माफ करा सामाजिक बांधिलकी कधीही चुकीच्या पद्धतीने काम करत नाही. तर ही संस्था लोकहित जपणारी रजिस्टर संस्था आहे. परंतु हा राग आणि तळमळ का आहे. याचे कारण अशा घटना आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो आणि हाताळतो देखील ज्या फार भयंकर आणि वेदनादायक असतात. काल कोणाचं कोण गेलं माहित नाही परंतु या डोळ्यांनी पाहिलेले चित्र इतकं वेदना दायक व भयंकर होतं की रात्रभर झोप लागली नाही. कारण त्या रक्ताबंबाळ प्रेतांना मी स्वतः उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. ते चित्र अजूनही डोळ्यासमोर उभ आहे. कारण त्या रक्तामध्ये आम्ही भिजलो होतो. खरंच सावंतवाडीतील युवा पिढी व जनतेचे कौतुक करण्या सारखे आहे. अशा घटनांच्या वेळी सर्व एकत्र येऊन युद्ध पातळीवर काम करतात आणि प्रशासनाचे काम हलकं करतात. प्रशासन आता तरी जागे व्हा अजूनही वेळ गेली नाही. निष्पाप लोकांचा जीव वाचवण्यासाठी जबाबदारीने काम करा आम्ही आपल्या सोबत आहोतच. यात काही चुकलं तर क्षमा असावी.

रवी जाधव, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग (सावंतवाडी) 9405264027