Home स्टोरी भाजपाकडून स्थानिकांमध्ये बेरोजगारी पसरून नवीन वाद निर्माण केला जाणार आहे का? माजी...

भाजपाकडून स्थानिकांमध्ये बेरोजगारी पसरून नवीन वाद निर्माण केला जाणार आहे का? माजी आमदार परशुराम उपरकर

97

कणकवली प्रतिनिधी:

जी मुंबई मराठी, कोकणी माणसांची होती ती अशाच प्रकारच्या राजकीय मतांच्या बेरजेत परप्रांतीयांच्या ताब्यात गेली आहे. आता तर भाजपाने सिंधुदुर्गमध्ये उत्तर भारतीय मोर्चाची स्थापना करून कोकणातही ही संघटना स्थापन केली आहे. सिंधुदुर्ग असेल किंवा कोकण हे कोकणी माणसांचे असून तेथे अशा प्रकारे मतांच्या राजकारणासाठी केला जाणारा शिरकाव सर्वपक्षीयांनी विरोध करून मोडून काढला पाहिजे असे मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

 

 

भारतीय जनता पक्षाने नुकतीच सिंधुदुर्गमध्ये बैठक घेत उत्तर भारतीय मोर्चाची स्थापना केली आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार परप्रांतीय म्हणून कणकवलीत आलेल्या सेलला विरोध करतात तर दुसरीकडे भाजपाकडून उत्तर भारतीय म्हणजेच भैय्या लोकांना एकत्र करून मतांसाठी राजकारण केले जात आहे. मतांसाठी अशा प्रकारे मोर्चाची स्थापना करून भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गमध्ये जो नवीन पायंडा पाडत आहे त्याला हेच भारतीय जनता पक्षाचे आमदार, मंत्री संरक्षण देणार का? असा सवालही श्री उपरकर यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारा बलुतेदार आज नोकरी व्यवसायासाठी भटकत आहेत. परप्रांतीयांनी अनेक व्यवसाय ताब्यात घेत येथील स्थानिकांना बेरोजगार केले आहे. अशा स्थितीत भाजपाकडून स्थानिकांमध्ये बेरोजगारी पसरून नवीन वाद निर्माण केला जाणार आहे का असा सवाल करत भाजपने पक्ष बांधणीच्या नावाखाली उत्तर भारतीयांना एकत्र करून जे राजकारण सुरू केले आहे त्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावीच लागेल.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सातत्याने कोकणवासी यांना जमिनी विकू नका असे आवाहन करत आहेत. मात्र अशा प्रकारे उत्तर भारतीयांना राजकीय पाठबळ देत येथील जमिनी त्यांच्या घशात घालूनभविष्यात कोकणवाशीयांनाच परके केले जाण्याची भीती आहे.

अशाप्रकारे उत्तर भारतीय मोर्चा स्थापन करून त्यात सहभागी असलेल्यांची त्या त्या राज्यातील राजकीय व इतर पार्श्वभूमी तपासण्याची गरज आहे. पोलिसांनी ही राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी यासाठी प्रसंगी आंदोलन ही करण्याची आमची तयारी आहे. कोकणची मुंबई होऊ नये यासाठी कोकणी माणसाने किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी आत्ताच पाऊल उचलून एकत्र येत याला विरोध करण्याची गरज आहे. याच उत्तर भारतीय भैय्यांच्या त्रासाला कंटाळून कोकणी माणसांनी मुंबई सोडली त्यांना भविष्यात सिंधुदुर्ग आणि कोकण भाजप सोडायला लावणार का असा सवालही श्री. उपरकर यांनी केला आहे.