Home शिक्षण स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले मौलिक...

स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले मौलिक मार्गदर्शन!

104

सावंतवाडी: कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर स्वतःचे वेळापत्रक तयार करा, परीक्षेचा अभ्यासक्रम, यापूर्वी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका यांचे अवलोकन करा. तसेच वेळेचे नियोजन करून ते प्रत्यक्षात अमलात आणा, अशा महत्वाच्या बाबी काळजीपूर्वक हाताळून स्वतःचं मूल्यमापन स्वतःच करा, असे अनेक प्रकारचे मौलिक धडे आज सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पर्धा परीक्षार्थींना दिलेत. सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडेमी येथे ‘स्पर्धा परीक्षांची तयारी‘ या विषयावर सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील, महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर उपस्थित होते. प्रारंभी अकॅडेमीच्या वतीने तहसीलदार श्री. पाटील यांचे महेंद्र पेडणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या मार्गदर्शनातून तहसीलदार श्रीधर पाटील यांनी विविध स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी उपस्थितांना सुयोग्य व मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदारांनी स्वतः हातात खडू घेऊन विद्यार्थ्यांना विविध महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती देऊन स्पर्धा परीक्षांसंबंधी विविध टिप्स देखील दिल्या. आपल्या तब्बल दीड तासाच्या मार्गदर्शनातून तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वानुभव कथन करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातील आव्हाने, स्पर्धा परीक्षासाठी लागणारी मानसिकता तसेच अपयश आल्यानंतर खचून न जाता जिद्दीने पुन्हा अभ्यास करण्यासाठी तत्पर राहावे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी उपस्थित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. पाटील म्हणाले, कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नैसर्गिक गुणवत्ता आहे. मात्र असे असले तरी स्पर्धा परीक्षांमधील अपयश चिंताजनक बाब आहे. आता ही उणीव भरून काढण्याची गरज आहे. त्यासाठी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या सारख्या अनुभवी अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे आता हा मार्ग सुकर होणार आहे, असे सांगत आगामी स्पर्धा परीक्षांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याचे आवाहनही प्रा. रूपेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी पीयुषा वारंग, वसंत पेडणेकर, स्नेहा परब, ममता पेडणेकर आदींनी संयोजन केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.