Home स्टोरी कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला प्रा.मधू दंडवतेंचे नाव दयावे!….

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला प्रा.मधू दंडवतेंचे नाव दयावे!….

159

 

कोकणात टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात आणि सर्व गणपती स्पेशल ट्रेन गोवा,कर्नाटक आणि केरळात!

सिंधुदुर्ग: कोकण रेल्वेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली पण कोकण रेल्वेने कोकणाला काय दिले? कोकण रेल्वेच्या उभारणीत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक २२% गुंतवणूक करूनही कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला फक्त तुतारी एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी पॅसेंजर व दिवा रत्नागिरी पॅसेंजर ह्या तीनच रेल्वे आल्या, तर ६% गुंतवणूक करणाऱ्या गोवा राज्याला ११ रेल्वे, १५% गुंतवणूक करणाऱ्या कर्नाटक राज्याला ६ रेल्वे, ६% गुंतवणूक करणाऱ्या केरळ राज्याला तब्बल २३ रेल्वे, तर कोणतीही गुंतवणूक न करणाऱ्या तामिळनाडू राज्याला ६ रेल्वे नेहमीसाठी मिळाल्या आहेत. त्यामुळेच गणपती बाप्पा कोकणात व सर्व गणपती स्पेशल ट्रेन गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यात न्याव्या लागत आहेत,दरवर्षी साधारण रेल्वे प्रशासन ४०० गणपती स्पेशल ट्रेन सोडूनही कोकणात टर्मिनस नसल्याने त्या सर्व दक्षिणेतील राज्यांमध्ये न्याव्या लागतात परिणामी याचा आरक्षण कोठाही विभागला जातो व त्यामुळे ४०० ट्रेनही कोकणवासिय चाकरमन्यांना कमी पडतात,फक्त नाव कोकण रेल्वे फायदा मात्र दक्षिणेतील राज्यांना कोकण रेल्वेचा महाराष्ट्राला फायदा काय? असा संतप्त सवाल कोकणातील भूमिपुत्र राज्य व केंद्र सरकारला विचारत आहेत.

सावंतवाडी स्टेशन येथे फेज एक मध्ये काही कामे करण्यात आली मात्र तरीही अपुरी प्लॅटफॉर्मची संख्या, एक्सप्रेस उभ्या करण्यासाठी यार्डची व्यवस्था नाही, रेल्वेच्या स्वच्छतेसाठी व पिण्यासाठी मुघलक पाण्याची व्यवस्था नाही, प्लॅटफॉर्मवर छप्पर ची व्यवस्था नाही, अपुरा आरक्षण खोटा अशी सावंतवाडी टर्मिनसची आजची अवस्था आहे त्यामुळे फेज दोनचे काम केव्हा केले जाईल असा सवाल कोकणकर शासनाला विचारत आहेत? टर्मिनस म्हणून आवश्यक असणारी सर्व कामे लवकर पूर्ण करावीत व सावंतवाडी टर्मिनस ला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे अशा स्वरूपाचे मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदनाच्या प्रती कोकण रेल्वेचे सीएमडी मा.श्री.संजय गुप्ता साहेब,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय रेल्वेमंत्री मा.श्री.अश्विनी वैष्णव साहेब, सिंधुदुर्गचे खासदार मा.श्री.विनायक राऊत साहेब,माजी रेल्वेमंत्री मा.श्री.सुरेश प्रभू साहेब, केंद्रीय उद्योग मंत्री मा.श्री.नारायण राणे साहेब,व रायगडचे खासदार मा. श्री.सुनील तटकरे साहेब यांना दिल्या असून निवेदनावर प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार व अध्यक्ष श्री.शांताराम नाईक यांनी सह्या केल्या आहेत.