Home स्टोरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ दिवसांचा गोवा दौरा आटोपून दिल्लीला मार्गस्थ!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ दिवसांचा गोवा दौरा आटोपून दिल्लीला मार्गस्थ!

180

कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर, वेर्णा येथील श्री महालसा मंदिर आणि जुने गोवे येथील चर्च यांना दिली भेट….

गोवा: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३ दिवसांचा गोवा दौरा आटोपून २४ ऑगस्ट या दिवशी दुपारी देहलीला परतल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २४ ऑगस्ट या गोवा दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर, वेर्णा येथील श्री महालसा मंदिर आणि जुने गोवे येथील बासिलिका बॉम जीसस चर्च यांना भेटी दिल्या.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जुने गोवे येथील चर्चला भेट दिल्यानंतर कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिराला भेट देण्यासाठी जात होत्या. त्यांचा ताफा फर्मागुडी येथे पोचला असता विद्यार्थ्यांनी त्यांना हात उंचावून अभिवादन केले. विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर राष्ट्रपतींनी गाडी थांबवली आणि खाली उतरून चालत ‘जी.व्ही.एम्स.’च्या संकुलात येऊन त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत काही क्षण घालवले. यानंतर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्या पुढील प्रवासाला मार्गस्थ झाल्या. यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गा मंदिर आणि वेर्णा येथील श्री महालसा मंदिर यांना भेटी दिल्या. तेथील मंदिरांच्या समित्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले. दोन्ही मंदिरांमध्ये श्रींचे दर्शन घेतल्यानंतर त्या देहलीला परतीच्या प्रवासाला निघाल्या.

 

राष्ट्रपती मुर्मू यांची श्री शांतादुर्गादेवीकडे देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना !

राष्ट्रपती मुर्मू यांनी कवळे, फोंडा येथील श्री शांतादुर्गादेवीकडे ‘नागरिकांचा उद्धार व्हावा, तसेच देशाचा विकास आणि समृद्धी व्हावी’, अशी प्रार्थना केली. ही प्रार्थना त्यांनी मंदिरात ठेवलेल्या वहीत लिहिली आहे.