Home स्टोरी ‘पालट घडवूया’ अभियानाद्वारे राज्‍यातील ६४ सहस्र ३८ लाख विद्यार्थी देणार स्‍वच्‍छतेचा संदेश...

‘पालट घडवूया’ अभियानाद्वारे राज्‍यातील ६४ सहस्र ३८ लाख विद्यार्थी देणार स्‍वच्‍छतेचा संदेश !

115

मुंबई: – राज्‍यशासनाच्‍या ‘पालट घडवूया’ म्‍हणजेच ‘लेट्‍स चेंज’ या अभियानाच्‍या अंतर्गत महाराष्‍ट्रातील ६४ सहस्र शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी नागरिकांना स्‍वच्‍छतेचा संदेश देणार आहेत. हे विद्यार्थी ‘स्‍वच्‍छता मॉनिटर्स’ म्‍हणून काम करणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे २३ ऑगस्‍ट या दिवशी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘या अभियानाद्वारे राज्‍यातील स्‍वच्‍छतेमध्‍ये आमूलाग्र पालट होईल’, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, ‘पालट घडवूया’ या उपक्रमाचे संचालक रोहित आर्या यांच्‍यासह ‘स्‍वच्‍छता मॉनिटर’ विद्यार्थी उपस्‍थित होते.या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले, ‘‘निश्‍चय केला की, पालट घडतोच. त्‍यातही लहान मुले सांगतात, ते मोठ्यांना ऐकावेच लागते. ‘स्‍वच्‍छता’ हा आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने महत्त्वाचा विषय आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘स्‍वच्‍छ भारत’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्‍यातील या उपक्रमामुळे आणि त्‍यात विद्यार्थ्‍यांच्‍या मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे महाराष्‍ट्र स्‍वच्‍छतेच्‍या संदर्भात अग्रेसर व्‍हायला वेळ लागणार नाही.’’

 

या वेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘स्‍वच्‍छतेची चळवळ देशभर चालू असून राज्‍यात ‘स्‍वच्‍छता मॉनिटर्स’ अभियानाच्‍या माध्‍यमातून विद्यार्थी समाजाला पालटण्‍याची किमया करू शकतात’, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. या अभियानाच्‍या अंतर्गत येत्‍या २ ऑक्‍टोबर या गांधी जयंतीच्‍या दिवशी सर्वोत्तम ५ जिल्‍हे, १०० शाळा आणि ३०० विद्यार्थी यांना मुंबई येथे समारंभपूर्वक पारितोषिके देऊन सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

 

या अभियानाद्वारे विद्यार्थ्‍यांकडून स्‍वच्‍छता करून घेणे अपेक्षित नाही. विद्यार्थी ‘स्‍वच्‍छता मॉनिटर’ होण्‍याचे दायित्‍व घेतील. कुठेही निष्‍काळजीपणे कचरा टाकतांना किंवा थुंकतांना कुणी दिसले, तिथे त्‍या व्‍यक्‍तीला थांबवून चूक दाखवून ती सुधारायला सांगतील. नंतर या घटनेचे छोटे मजेशीर विवरण देतांनाचे व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित करण्‍यात येणार आहेत. या अभियानात निवडलेल्‍या विद्यार्थ्‍यांना ‘महाराष्‍ट्र स्‍वच्‍छता मॉनिटर’ ओळखपत्र देऊन गौरवण्‍यात येईल.