कुडाळ: जी लोकं परिस्थितीला दोष देतात आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि भौतिक परिस्थितीला पुढे करून आपल्या अपयशाची कारणे देतात, ती व्यक्ती जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत. जीवनात यश मिळविण्यासाठी असेल त्या परिस्थितीच्या छाताडावर पाय ठेवून, जिद्दीने यशाची कास धरावी लागते. तरच यशाची चव चाखता येते, असे प्रतिपादन परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांनी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित कार्यक्रमादरम्यान केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवारी कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रा. परब बोलत होते.
यावेळी कुडाळ तालुक्यातील चर्मकार समाजातील सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात स्कॉलरशिप, नवोदय परीक्षा, इयत्ता दहावी, इयत्ता बारावी, पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा विशेष उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुडाळ तालुक्याचे अध्यक्ष मनोहर सरमाळकर होते. तर प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, संचालक आत्माराम ओटवणेकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण, ॲड. अनिल निरवडेकर, नायब तहसीलदार प्रदीप पवार, यांच्यासह प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून परफेक्ट अकॅडेमीचे चेअरमन प्रा. राजाराम परब व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक रुपेश पाटील उपस्थित होते.
प्रा. राजाराम परब व प्रा. रूपेश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. राजाराम परब म्हणाले, कोकणात प्रचंड विद्वत्ता आहे. मात्र या विद्वत्तेला सातत्याची जोड नाही. जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेला सातत्य आणि परिश्रमाची जोड दिली, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही, असे सांगत त्यांनी परफेक्ट अकॅडेमीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व समाज बांधवांना योग्य ते सहकार्य करण्याचीही ग्वाही दिली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पाताडे, सिंधुदुर्ग जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर आंबेकर, जिल्हा सहसचिव सुभाष बांबुळकर, भवन समिती सहप्रमुख के. टी. चव्हाण, उदय शिरोडकर, भवन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण, कुडाळ तालुका मार्गदर्शक राजन वालावलकर, जिल्हा सदस्य प्रिया आजगावकर, जिल्हा सदस्य ॲड. राजीव कुडाळकर, कुडाळ तालुका सल्लागार रामदास चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन कुडाळ तालुका कार्यकारिणीचे सचिव रत्नदीप जाधव, कोषाध्यक्ष मधुकर चव्हाण, उपाध्यक्ष साधना चव्हाण, राजन चव्हाण, संतोष चव्हाण, प्रमोद आजगावकर, सहसचिव रश्मी वालावलकर, केतन शिरोडकर, प्रकाश तेंडोलकर, राजेश चव्हाण, तसेच सदस्य प्राध्यापक सुभाष बांबुळकर, देविदास चव्हाण, सुरेश पिंगुळकर, लक्ष्मण पावसकर, नरेंद्र चव्हाण, प्रिया आजगावकर, सुजाता जाधव, गजानन बांबुळकर, नितीन बांबर्डेकर, दत्ताराम कसालकर, अविनाश अणावकर, गणपत चव्हाण, बाळकृष्ण चव्हाण, मधुकर जाधव, संतोष चव्हाण , बापू हुमरमळेकर, दीपक चव्हाण, सुप्रिया कसलकर व कायदेशीर सल्लागार ॲड. राजीव कुडाळकर यांनी केले. प्रास्ताविक रत्नदीप जाधव यांनी तर सूत्रसंचालन प्रा. बांबुळकर यांनी केले.