Home राजकारण अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील! माजी मंत्री बच्चू...

अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील! माजी मंत्री बच्चू कडू

224

१७ ऑगस्ट वार्ता: उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा  सुरु आहे. ही चर्चा सुरू असतानाच माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे.

 

अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील. शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत आले आहेत. जेव्हा भाजपसोबत कोणीच नव्हतं तेव्हा शिंदे त्यांच्यासोबत आले. त्यांनी मोठी रिस्क घेतली. वर्षभरानंतर त्यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

काका-पुतण्याच्या भेटीगाठीवरून संभ्रमित होण्याचं काही कारण नाही. प्रत्येक नेता आपला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात काही वावगं नाही. आम्हीही तेच करत असतो. शरद पवार यांच्या स्वभावाची मोजणी करणं शक्य नाही. समुद्राचा तळ मोजला जाईल, पण शरद पवार यांच्या मनात काय चाललं हे ओळखणं शक्य नाही, असं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं.

राष्ट्रवादीचा गेम करण्यासाठी भाजपने पावलं टाकली असतील. पण शरद पवारच भाजपचा गेम करतील की काय अशी अवस्था आहे. त्यामुळे सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. जे वरवर दिसतं ते तसं नाहीये. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणताही वाद नाही. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आहे. तो सुसंवाद आहे. सध्या दोघांचे मार्ग वेगळे असतीलही पण भविष्यात ते एकत्र येतील, असा दावाही बच्चू कडू यांनी केला.