Home स्टोरी वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले नाव हे छत्रपती संभाजी महाराजांच्‍या कर्तृत्‍वाचा सन्‍मान ! –...

वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले नाव हे छत्रपती संभाजी महाराजांच्‍या कर्तृत्‍वाचा सन्‍मान ! – उदयनराजे भोसले

134

सिंधुदुर्ग प्रतिनिधी:  सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्‍यात आले आहे. ऐतिहासिक सातारा नगरीत वैद्यकीय महाविद्यालयासारख्‍या मोठ्या महत्त्वाच्‍या वास्‍तूस समर्पक नाव दिले गेले आहे. त्‍यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या कार्यकर्तृत्‍वाला योग्‍य तो सन्‍मान मिळाला आहे, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. यात पुढे म्‍हटले आहे की, सातारा वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्‍ह्याच्‍या विकासातील महत्त्वाचा टप्‍पा आहे. यामुळेे सातार्‍याच्‍या सर्वांगीण विकासाच्‍या वाटचालीत मोठा हातभार लागला आहे. आंतरराष्‍ट्रीय निकषाप्रमाणे भारतात सार्वजनिक आरोग्‍य सेवा पुरेशा प्रमाणात प्रदान करण्‍याचे सरकारचे अखंड प्रयत्न चालू आहेत.

राज्‍यशासनाने हा निर्णय घोषित केला आहे. याविषयी आम्‍ही समाधानी आहोत.त्यामुळेच वैद्यकीय शिक्षण घेऊन येथून बाहेर पडणारी वैद्यकीय अधिकार्‍यांची तुकडी छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या कार्याची प्रेरणा घेऊन कार्यरत रहाणार आहे. त्‍यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव ऐतिहासिक भूमीतील वैद्यकीय महाविद्यालयाला देण्‍याविषयी आम्‍ही आग्रही होतो. या निर्णयामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या धगधगत्‍या कार्य कर्तुत्वाची प्रेरणा सर्वांनाच अखंडपणे मिळत रहाणार आहे. सर्वसमावेशक नामाभिधान राज्‍यशासनाने केल्‍याने आम्‍ही मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार आणि समस्‍त मंत्रिमंडळाचे अभिनंदन करत आहोत.