सावंतवाडी प्रतिनिधी: १२५ वर्षांची प्रदीर्घ शैक्षणिक परंपरा लाभलेले सावंतवाडी शहरातील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, बहुपरिचित कळसुलकर इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या उत्तुंग यशाच्या गौरवासाठी आज सावंतवाडी शहरात भव्य प्रभात फेरी व मिरवणूकिचे आयोजन करण्यात आले होते.

अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याचे काल नवी दिल्लीवरून सावंतवाडीत आगमन झाल्यानंतर आज सकाळी दहा वाजता शिवाजी महाराज चौकातून ओपन जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात व लेझीमच्या मधुर तालावर, राष्ट्रीय छात्र सेनेच्या गणेश गणवेशातील छात्र सैनिकांच्या मानवी साखळीने दिमाखदार प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोरून, श्रीराम वाचन मंदिर, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे, जयप्रकाश चौकातून पुढे सरकत अकरा वाजता प्रशालेच्या प्रवेशद्वारावर पोहोचली.

प्रवेशद्वारावर शिक्षकांनी अनंतचे औक्षण करून त्याचे वाजत-गाजत स्वागत केले. या अभूतपूर्व सोहळ्यास समस्त शिक्षकवर्ग, विद्यार्थीवर्ग, पालक, हितचिंतक, शुभचिंतक व संस्थेचे पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती होती. या बहुचर्चित व वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ऐनवेळी जबाबदारी स्वीकारणारे भारतीय सेनेचे सेवानिवृत्त सेनाधिकारी लेफ्टनंट कर्नल रजनीश सिन्हा यांची उपस्थिती कार्यक्रमाला चार चांद लावणारी ठरली.


तसेच, प्राचार्यांच्या आग्रहास्तव उपस्थित असलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र पोलीस दलात निरीक्षक म्हणून सावंतवाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले आदरणीय अमोल चव्हाण सर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.

यावेळी प्रशालेचे एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांना सुवर्णपदक विजेता अनंत चिंचकर याचे मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून सर्वांनी विशेष आपुलकीने शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. त्यांच्या कामाची कार्य कुशलता पाहता सावंतवाडी एज्युकेशनचे अध्यक्ष मा. श्री.शैलेश पई यांनी त्यांना व्यासपीठावर शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित तर केलेच त्याचबरोबर त्याच्या कार्याचा गौरव ही करण्यात आला.प्रशाळेचे सहाय्यक शिक्षक तथा एनसीसी अधिकारी गवस सर हे देखील आपल्या शालेय जीवनामध्ये एनसीसी कॅडेट राहिले आहेत व त्यांनी सुद्धा सन 2003 मध्ये मुख्य गणतंत्र दिवस शिबिर नवी दिल्ली राजपथ वर परेड मध्ये सहभाग नोंदवला होता. आपल्या विद्यार्थ्यांनी तिथेपर्यंत पोहोचावे ही त्यांची इच्छा व त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना इसवी सन 2023 मध्ये त्यांची विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर हिने नवी दिल्ली येथील मुख्य गणतंत्र दिवस शिबिरामध्ये सहभागी होऊन मिळवून दिले. राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये दुसरे महत्त्वाचे शिबिर म्हणजे थल सैनिक शिबिर या शिबिरामध्ये आपला विद्यार्थी पोहोचला पाहिजे यासाठी ते अहोरात्र अथक परिश्रम घेत होते आणि हे त्यांचे स्वप्न अनंताच्या रूपाने पूर्ण झाले. हा आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटत राहतो त्यांची यशस्वी वाटचाल पाहून त्याला त्यातच समाधान वाटते हे आज अनंतने त्यांचे स्वप्न पूर्ण करून दाखवून दिले.


अनंतने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कोल्हापूर विभाग स्तरीय अमरावती राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अतुलनीय कामगिरी करत मजल दरमजल प्रगती व आपल्या सरावांमध्ये सातत्य ठेवत दिल्लीपर्यंतची शर्यत पूर्ण केली. फक्त शर्यतच पूर्ण नाही केली तर दिल्लीत पोहोचल्यानंतरही आपल्या सरावांमध्ये सातत्य ठेवून संपूर्ण देशातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या जवळपास पंधराशे विद्यार्थ्यांमधून सुवर्णपदक आपल्या प्रशाळेसाठी प्राप्त करून दिले. या त्याच्या सुवर्णमयी यशामध्ये आपले प्रशाळेचे एनसीसी अधिकारी गवस सर यांचा, शाळेचा, सहकारी कॅडेटचा, पालकांचा, हितचिंतकांचा, मोठा वाटा असल्याचे त्याने व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करताना आवर्जून सांगितले.









