सावंतवाडी प्रतिनिधी: १२५ वर्षांची प्रदीर्घ व शैक्षणिक परंपरा लाभलेले सावंतवाडी शहरातील बहुपरिचित कळसुलकर इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी सर्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या उत्तुंग यशाच्या गौरवासाठी त्याचे काल नवी दिल्लीवरून सावंतवाडीत आगमन झाले.
आज सकाळी दहा वाजता शिवाजी महाराज चौकातून ओपन जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात व लेझीमच्या मधुर तालावर, राष्ट्रीय छात्र सेनेच्या साखळीने दिमाखदार प्रभातफेरी काढण्यात आली. ही प्रभातफेरी माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोरून, वाचन श्रीराम वाचन मंदिर, गांधी चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे, जयप्रकाश चौकातून पुढे सरकत अकरा वाजता प्रशालेच्या प्रवेशद्वारावर पोहोचली.
प्रवेशद्वारावर शिक्षकांनी अनंतचे औक्षण करून त्याचे वाजत-गाजत स्वागत केले. या अभूतपूर्व सोहळ्यास समस्त शिक्षकवर्ग, विद्यार्थीवर्ग, पालक, हितचिंतक, शुभचिंतक व संस्थेचे पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती होती.
या बहुचर्चित व वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ऐनवेळी जबाबदारी स्वीकारणारे भारतीय सेनेचे सेवानिवृत्त सेनाधिकारी लेफ्टनंट कर्नल रजनीश चिन्हा यांची उपस्थिती कार्यक्रमाला चार चांद लावणारी ठरली.
तसेच, प्राचार्यांच्या आग्रहास्तव उपस्थित असलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र पोलीस दलात निरीक्षक म्हणून सावंतवाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले आदरणीय अमोल चव्हाण सर यांच्या गणवेशाचे दर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
यावेळी प्रशालेचे एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांना सुवर्णपदक विजेता अनंत चिंचकर यांचे मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून सर्वांनी विशेष आपुलकीने शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त केले.






