सावंतवाडी प्रतिनिधी: दिनांक १० जुलै रोजी माणगांव येथील श्री. वासुदेवानंद सरस्वती वाचनालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. केंद्र शाळा नं एकच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सुरेल प्रार्थना सादर केली. यावेळी दहावी व बारावीच्या विविध शाखांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा गुणगौरव कार्यक्रम श्री. महेश मंगेश माणगांवकर यांनी पुरस्कृत केलेला आहे. यावेळी श्री. वा.स.विद्यालय, माणगांवचे निवृत्त शिक्षक श्री. राजेश शेणई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महर्षी व्यासांची महती सांगितली. त्याचप्रमाणे पुस्तके आपल्या आयुष्यात गुरू म्हणून महत्वाची भूमिका बजावतात यासाठी वाचन करणे महत्वाचे आहे असा मोलाचा सल्ला त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी वाचनालयाला रोख पाच हजार रुपयांची देणगी दिली.
वाचनालयाच्यावतीने माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक परशुराम चव्हाण तसेच विद्यमान अध्यक्षा स्नेहा फणसळकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी श्री. एकनाथ केसरकर आणि प्रकाश केसरकर यांनी पुरस्कृत केलेली वाचक भाग्यांक स्पर्धा झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव श्री एकनाथ केसरकर यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सदाशिव पाटील यांनी मानले. वाचनालयाच्या अध्यक्षा सौ. स्नेहा फणसळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संचालक मेघःशाम पावसकर, शरद कोरगांवकर, माजी अध्यक्ष कॅ. खोचरे, निवृत्त शिक्षक एस. के. परब, श्री. मंगेश रांगणेकर, शिक्षिका प्रतिभा बदने, श्री lपिळणकर, श्री. बांदेलकर, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.