Home स्टोरी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला सामाजिक बांधिलकीकडून इन्व्हर्टर भेट

आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला सामाजिक बांधिलकीकडून इन्व्हर्टर भेट

340

सावंतवाडी प्रतिनिधी: आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दिनांक १९  जुलै २०२४ रोजी रात्री एका स्त्रीची प्रसूती मेणबत्ती व मोबाईलच्या टॉर्च वर करण्यात आली होती. याचे कारण प्राथमिक आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टर गेले तीन महिन्यापासून बंद होता. दोन-तीन दिवसांपूर्वीच्या जोरदार पावसामुळे त्या परिसरामध्ये गेले तीन दिवस लाईट नसल्याकारणाने तेथील डॉक्टरांवर मेणबत्तीच्या प्रकाशावर प्रसूती करण्याची वेळ आली होती. नशिबाने माता व बाळ सुखरूप आहेत. याबाबतचे समाधान तेथील डॉक्टरांनी व्यक्त केले. जेव्हा ही बातमी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना समजली असता त्यांनी या गंभीर प्रकाराबाबत पुढाकार घेऊन संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे व सचिव समीरा खलील यांना त्याची कल्पना दिली. त्यानंतर खलील यांनी लगेचच आंबोली येथील प्राथमिक केंद्रातील डॉ. जाधव यांच्याशी संपर्क करून घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती मिळवली. तेव्हा असं समजलं की गेले दोन-तीन दिवस मेणबत्ती व मोबाईलच्या टॉर्च वर पेशंटची तपासणी सुरू आहे. परिस्थिती समजून घेत समीरा यांनी स्वतःकडील काही पैसे  सामाजिक बांधिलकी संस्थेचे रवी जाधव यांच्याकडे दिली. तर उर्वरित रक्कम रवी जाधव, रूपा मुद्राळे व सुजय सावंत यांनी घालून सदर इन्व्हर्टर लगेचच खरेदी केला. तर इतर खर्च संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, शरद पेडणेकर, शामराव हळदणकर व हेलन निबरे यांनी केला.

यासाठी मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांचे. तळवणकर यांनी सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अवघ्या अर्ध्या किमतीमध्ये संस्थेला इन्व्हर्टर उपलब्ध करून दिला व संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर स्वतः आंबोली येथे जाऊन सदर इन्वर्टरचे कनेक्शन जोडून प्रसूती विभाग व इतर विभाग प्रकाशमय केले.

लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्काळ सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. परंतु या विषयासंदर्भात शासनाची देखील काहीतरी जबाबदारी आहे. यासाठी शासनाने देखील या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून नागरिकांची गैर सोय होणार नाही याची काळजी घ्यावी. असे मत सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांनी व्यक्त केले.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी संतोष तळवणेकर यांचे आभार मानले. तर व प्राथमिक केंद्रातील डॉ. जाधव यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे व संतोष तळवणेकरांचे आभार मानून संस्थेला आभाराचे पत्र दिले. याप्रसंगी आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.