सावंतवाडी: आंबेगाव सटवाडी येथील सौ. शितल विठ्ठल शेळके (३६ ) ही महिला गेल्या सहा महिन्यापासून गर्भ पिशवीच्या कॅन्सरच्या आजाराने त्रस्त आहे. आतापर्यंत लहान शस्त्रक्रिया झालेल्या शितल यांच्या पुढील दोन शस्त्रक्रियेसाठी सुमारे पाच लाख रुपयांची गरज आहे. या शस्त्रक्रियेसाठी जिल्हावासियांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी मदत करावी. ही तातडीची मदत सौ शितल यांना नवसंजीवनी देऊ शकते.
आंबेगाव येथील सौ शितल आणि त्यांचे पती विठ्ठल मोलमजुरी करतात आणि घर खर्चासह इयत्ता तिसरी आणि चौथीत शिकणाऱ्या विशाल आणि विकास या दोन्ही मुलांचा शिक्षण खर्च कसाबसा भागवतात. जमीन अथवा शेतीसह इतर उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची. अशा परिस्थितीत सौ शितल याना सहा महिन्यापूर्वी गर्भ पिशवीचा कॅन्सर आजार झाल्याचे निष्पन्न झाले.
या आजाराने शेळके कुटुंबीय अक्षरशः कोलमडून पडले. कारण आतापर्यंत या आजाराच्या प्राथमिक उपचारांसाठी पोटाला चिमटा काढीत साठवून ठेवलेली आयुष्यभराची सुमारे दीड लाखाची कमाई त्यांनी खर्च केली. पुढील उपचारांसाठी शेळके कुटुंबीयांनी कोल्हापूर तसेच गोवा येथे चौकशी केली असता शस्त्रक्रियेसाठी पाच लाखाचा खर्च सांगण्यात आला आहे. तात्काळ शस्त्रक्रिया न केल्यास हा आजार वाढू शकतो. त्यामुळे किमान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.
मात्र यासाठी पाच लाखाचा खर्च ऐकून शेळके कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न शेळके दांपत्यासमोर आहे. तिची दोन्ही चिमुरडी मुले शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपली आई पूर्वीचे जीवन जगणार अशी त्यांना आशा आहे. सध्या या माऊलीची स्थिती पाहिल्यावर कुणालाही गहिवरून येईल. सौ शितल यांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलविण्यासाठी त्यांना समाजमनाच्या दातृत्वाची गरज आहे. आतापर्यंत शितलच्या उपचारासाठी शेळके कुटुंबियांनी होते नव्हते ते सर्व संपवले. त्यामुळे तरुण भारत च्या माध्यमातून त्यांनी जिल्हावासीयाना मदतीसाठी हाक दिली आहे.
ज्याना सौ शितल यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करावयाची आहे. त्यांनी त्यांचे पती विठ्ठल धोंडू शेळके खाते नंबर ११०१०९८०९८१७, आय एफ एस सी कोड – सि एन आर बी ०००२७९८, कॅनरा बँक, शाखा – सावंतवाडी आणि ८७६६०३३८१५ या गुगल पे नंबरवर जमा करावयाची आहे. अधिक माहितीसाठी ८७६६०३३८१५ या मोबाईलवर संपर्क साधावा.