सावंतवाडी: सेवानिवृत्त शिक्षक हे समाजाचे खरे मार्गदर्शक असतात, दीपस्तंभ समान त्यांची भूमिका असते. सेवानिवृत्ती म्हणजे सेवेला पूर्णविराम नव्हे तर ती सेवापूर्ती समजून पुढील काळात आपल्या अनुभवांची शिदोरी समाजसेवेसाठी देणे आणि अध्यापनाचा आपला तहह्यात भाग समजून आपली जबाबदारी सातत्याने पार पाडून आपल्या ज्ञानाचा दीप सातत्याने ठेवत ठेवावा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक रुपेश पाटील यांनी आजरा येथे आयोजित कार्यक्रमात केले.
आजरा तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने २९ वे वार्षिक अधिवेशन रविवारी आजरा येथे संपन्न झाले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रुपेश पाटील बोलत होते. आजरा तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना आजरा यांच्या वतीने आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित आजरा, जिल्हा कोल्हापूर येथे २९ वे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनोहर नाईक होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष अब्दुल नेसरीकर, सचिव परशुराम पाटील, सदस्य शिवाजी बिरजे, गंगाराम पन्हाळकर, बाळू धुरी, आप्पासो जाधव, रमेश पवार, तुकाराम सुतार, विष्णू मुळीक, भीमराव कोरवी, सुहासिनी हळवणकर, नलिनी चोडणकर, भगवान पवार आदी उपस्थित होते.
दरम्यान आपल्या व्याख्यानात प्रा. रुपेश पाटील यांनी ‘सेवानिवृत्तनंतर शिक्षकांची जबाबदारी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. पाटील पुढे म्हणाले, सेवानिवृत्त शिक्षकांनी गावातील ग्रंथालय चळवळीत सहभाग द्यावा, आपल्या ज्ञानाची शिदोरी गावातील ग्रामस्थ व इतर व्यक्तींसोबत वाटून घ्यावी. पाणपोई, वर्तमानपत्रे, वाचनालये अशा विविध सुविधा स्वखर्चाने सुरू करून आपला समाजाप्रती असलेला सेवाभाव जोपासावा. निवृत्तीनंतर आपली प्रकृती व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योगा, प्रात्यक्षिके व दररोज सकाळी व संध्याकाळी निसर्ग संपन्न वातावरणात फेरफटका मारून फिरून येणे या गोष्टी नियमित कराव्यात. सोबतच विविध प्रात्यक्षिके, चर्चासत्रे यांच्यात सहभाग घेत आपल्या अनुभवात निश्चित ज्ञानातून लेखन प्रपंच सुरू ठेवावा. तसेच देशभर पर्यटन करावे, अशा गोष्टी केल्याने समाजात सेवानिवृत्त शिक्षक चैतन्य निर्माण करू शकतात, असे सांगत त्यांनी सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. रुपेश पाटील यांच्या हस्ते ऐंशी वर्ष पूर्ण केलेले सेवानिवृत्त शिक्षक जयवंत परुळेकर, पांडुरंग चव्हाण, रंगराव देसाई तसेच ७५ वर्षे पूर्ण केलेले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक गंगाराम पन्हाळकर, गोविंद जाधव, शंकर जांभळे, आप्पासो जाधव, कृष्णा पाटील, शिवाजी मोरे, विठ्ठल भिऊंगडे, गणपती कुंभार आदींचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच अहवाल सालात सेवानिवृत्त झालेले श्रीधर देसाई, संभाजी पाटील, जनार्धन पाटील, चंद्रशेखर पाटील, बळवंत शिंत्रे, बाळासाहेब पाटील, वसंत सावंत, नंदकुमार येसादे, महिपती मगदूम, सुभाष केसरकर, जयश्री वरेकर, शीला देसाई, सुचिता लाड, निर्मला सावंत यांचा सन्मान करण्यात आला तसेच जिल्हा पुरस्कार प्राप्त सुरेखा सुभाष नाईक या प्राथमिक शिक्षिकेचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष मनोहर नाईक यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंदराव भादवणकर यांनी केले.