Home स्टोरी इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुर येथे दाखल!

इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुर येथे दाखल!

101

२६ ऑगस्ट वार्ता: चंद्रयान 3 मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी बंगळुर येथे दाखल झाले. तेथे त्यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी बंगळुरूमधील एचएएल विमानतळाबाहेर स्थानिक लोक पहाटेपासून वाट पाहत जमले होते. मोदींचे आगमन होताच स्थानिक कलाकारांनी ढोल वाजवून आणि नृत्य करुन त्यांचं स्वागत केलं. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पोहोचले आहेत.

पंतप्रधान मोदींनी विमानतळाबाहेर ‘जय जवान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ ही घोषणा दिली. ‘आज बंगळुरुमध्ये दिसणारे हे दृश्य जोहान्सबर्ग आणि ग्रीसमध्येही दिसले. मी परदेशात असतानाच ठरवलं होतं की भारतात गेल्यावर आधी बंगळुरुला भेट देईन. सर्वप्रथम मी आपल्या शास्त्रज्ञांना सलाम करतो. शास्त्रज्ञांना भेटल्यानंतरच मी निघेन’, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

शनिवारी पहाटे बंगळुरुत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं. ‘मी आमच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यास उत्सुक आहे. चंद्रयान ३ च्या यशानं जगभरात भारताचा गौरव झालाय. शास्त्रज्ञांचं समर्पण आणि उत्कटता हीच खऱ्या अर्थानं अवकाश क्षेत्रातील आपल्या देशाच्या यशामागं प्रेरक शक्ती आहे’, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.