Home स्टोरी दत्ताराम गावडे येत्या १५ ऑगस्ट ला छेडणार उपोषण..! निर्णय नलागल्यास आमरण उपोषण...

दत्ताराम गावडे येत्या १५ ऑगस्ट ला छेडणार उपोषण..! निर्णय नलागल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा

202

सावंतवाडी: कारीवडे पेडवेवाडीत धर्माजी गावडे यांनी नैसर्गिक पाणी प्रवाहाला बाधा येईल अशा पद्धतीने बांधकाम केल्याने लगतच्या आपल्या घराला धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानिक तालुका ते जिल्हा प्रशासनाला अनेक निवेदने तसेच उपोषणे छेडूनही केवळ आश्वासना पलीकडे अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे हे बांधकाम काढण्याबाबत मंगळवारी १३ ऑगस्टपर्यंत ठोस कार्यवाही न केल्यास गुरुवारी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दत्ताराम गावडे यांनी दिला आहे.

याबाबत दत्ताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, आपल्या घर क्र. ९०६ च्या बाजुला नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत आहे. पावसाळ्यात हा प्रवाह दुथडी भरून वाहतो. याच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होईल पर्यायाने आपल्या घराला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने धर्माजी गावडे यांनी बांधकाम केले आहे. या बांधकामामुळे आपल्या घराच्या चारी बाजूने पाणी साचते. याबाबत ग्रामपंचायतीचे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने सदरचे बांधकाम काढण्याच्या सूचना करूनही संबंधिताने मी बांधकाम जैसे थे ठेवले. त्यानंतर गेल्या वर्षी १५ ऑगस्टला सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण छेडले असता गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार संबंधितावर कारवाई करण्याची सूचना देऊनही ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केली नाही.

त्यानंतर १ मे रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देताच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश देऊनही हा प्रश्न जैसे थे आहे.

त्यानंतर गेल्या ३ जुलै जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण छेडले असता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले. तसेच घराभोवती पाणी साचल्यास आपत्ती व्यवस्थापनला कळवण्याचा सल्ला दिला.

गेल्या ७ जुलैच्या पावसात घराभोवती पाणी साचले असता आपत्ती व्यवस्थापनला कळविल्यानंतर ते आले आणि तात्पुरता एक चिरा काढला. परंतु ही समस्या कायम असून गेले महिनाभर घराभोवती पाणी साचून आहे. तसेच तंटामुक्त समिती बैठकीतही संबंधिताने हे बांधकाम काढतो असे लिहून दिले होते परंतु त्याची पूर्तता न केल्याने ते कागदावरच राहिले. तसेच बांधकामासाठी ग्रामपंचायतकडे परवानगी मागितली आहे त्यात प्रथम दर्शनी संबंधिताने ग्रामपंचायतीची दिशाभूल केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायत अधिनियम १९५८ प्रमाणे संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश देऊनही स्थानिक ग्रामपंचायत याबाबत टाळाटाळ करीत आह.

   

त्यामुळेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार हे अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत मंगळवारी १३ ऑगस्ट पर्यंत संबंधितास आदेश न दिल्यास गुरुवारी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या चार कुटुंबीयांसोबत आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशारा दत्तराम गावडे यांनी दिला आहे.