१ नोव्हेंबर वार्ता: आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिलेले सुनावणीचे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नाकारले आहे. विधानसभाध्यक्षांनी शिवसेनेबाबत 31 डिसेंबरपर्यंत तर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, अशी निर्वाणीची तंबी न्यायालयाने आज दिली. अध्यक्षांना बराच वेळ दिला आहे. त्यामुळे दिलेल्या कालावधीत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्षांना देत आहोत, अशा खरमरीत शब्दांतही सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसाठी 29 फेब्रुवारीपर्यंतचे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होते. मात्र, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने हे वेळापत्रक स्पष्ट शब्दांत धुडकावून लावले असल्याने आता विधानसभाध्यक्षांना शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत डिसेंबर अखेरपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल जानेवारी अखेरपर्यंत सुनावणी पूर्ण करावी लागणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयासमोर या प्रकरणातील पुढची सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.