१८ ऑक्टोबर वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मंगळवार दि.१७ ऑक्टोबर रोजी भारताच्या अंतराळ कार्यक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीत भारताच्या आगामी अंतराळ मोहिमांच्या पूर्वतयारीचा व त्यातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. २०२५ साली भारतातून पहिला अंतराळवीर झेपावणार असून, त्याबाबतही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. २०४० ला चंद्रावर पहिला भारतीय उतरेल अशी आखणी करून त्या दिशेने काम करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिल्या. चांद्रयान ३ आणि आदित्य एल 1 मोहिमांच्या यशामुळे भारताने आता आणखी नवीन आणि महत्त्वाकांक्षी ध्येये बाळगायला हवीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. त्यात २०३५ मध्ये भारतीय अंतराळ स्थानक सुरू करणे आणि २०४० मध्ये चंद्रावर पहिला भारतीय उतरण्याची मोहीम यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसेच भारतीय वैज्ञानिकांनी आता शुक्र व मंगळ मोहिमांवरही काम करण्याचे आवाहन केले.