२९ ऑगस्ट वार्ता: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका १९ वर्षीय महिला सुरक्षा रक्षकावर तिच्या सुपरवायझरसह अन्य दोघांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्काराच्या प्रसंगानंतर पीडित महिलेनं विष प्राशन केलं. यानंतर सोमवारी उपचारादरम्यान पीडिते महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास केला जात आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपी अजय याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर पीडितेनं विष प्राशन केलं. यामुळे पीडितेची प्रकृती खालावल्याने तिच्याबरोबर काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. येथे उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला.
पीडित महिला मूळची झारखंड येथील रहिवासी आहे. गाझियाबादमध्ये ती तिच्या मावशीबरोबर हाऊसिंग सोसायटीच्या परिसरात राहत होती, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
डीसीपी (ग्रामीण) विवेक चांद यादव यांनी ‘पीटीआय’ला सांगितलं की, पोलिसांनी बलात्काराच्या कलमाअंतर्गत (३७६ आयपीसी) एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी तळघरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले आहेत. या फुटेजमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचा कोणताही गैरप्रकार आढळला नाही. त्यामुळे पीडितेच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.