नाशिक: अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पोषण आहारात महत्वाची भूमिका असून गेल्या सहा वर्षापासून पोषण माह सप्ताह राज्यभरात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याच योगदानामुळे यशस्वी होतांना दिसत आहे. राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या की, ० ते ६ वयोगटातील बालकांचे संगोपन महत्वाचे असून सुपोषीत भारताची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये मांडली आहे. राज्यात गेल्या सहा वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या पोषण माह उपक्रमात महाराष्ट्र राज्य हे देशात तिसऱ्या क्रमांकावर असून याचे पूर्ण श्रेय हे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाते. सुपोषीत भारत अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. अशा शब्दात मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित सेविका व मदतनीस व जिल्हा प्रशासानाचे कौतुक केले.