Home स्टोरी होळीचा इतिहास, महत्व आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत!

होळीचा इतिहास, महत्व आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत!

176

होळी (हुताशनी पौर्णिमा) सणामागील शास्त्र: फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. होळी सणाचे महत्त्व, हा सण साजरा करण्याची पद्धत याविषयीची शास्त्रीय माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

होळी सणाची तिथी : देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5 – ६ दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो.

होळी सणाला असलेले समानार्थी शब्द : उत्तर भारतात याला होरी, दोलायात्रा, तर गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत शिमगा, होळी, हुताशनी महोत्सव अन् होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण साजरा करतात. याला ‘वसंतोत्सव’ अथवा ‘वसंतागमनोत्सव’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नावही देता येईल.

होळी सणाचा इतिहास : (अ.) `पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नामक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. ती रोग निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण ती जाईना. शेवटी लोकांनी बीभत्स शिव्या-शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला भिववले अन् पळवून लावले. त्यामुळे ती गावाबाहेर पळून गेली.’ असे भविष्योत्तरपुराणात म्हटले आहे. आ. एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधी अवस्थेत असतांना मदनाने त्यांच्या अंतःकरणात प्रवेश केला. तेव्हा ‘मला कोण चंचल करत आहे’, असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. दक्षिणेतील लोक कामदेव दहनाप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करतात. या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.इ. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ या नावाने यज्ञ होऊ लागले.

होळीचे महत्त्व : (अ.) विकारांची होळी करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण : ‘होळी’ हा विकारांची होळी करण्याचा फाल्गुन मासातील सण आहे. ‘विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत’, याचे जणू तो प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्विक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा. श्रीकृष्ण-राधा यांनी रंगपंचमीद्वारे सांगितले, ‘आनंदाची उधळण करा.’ असे प.पू. परशराम पांडे महाराज यांनी म्हटले आहे. आ. होळी आपले दोष, व्यसने आणि वाईट सवयी यांना घालवण्याची सुसंधी आहे.इ. होळी सद्‍गुण ग्रहण करण्याची /अंगिकारण्याची संधी आहे.

होळी उत्सव साजरा करण्याची पद्धत : देशभरात सर्वत्र साजरा केला जाणार्‍या ‘होळी’ या सणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी होतात. होळीची रचना करण्याची तिला सजवण्याची पद्धतीही स्थानपरत्वे पालटत असल्याचे सध्या पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे ‘देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.श्री होलिकापूजनाचे स्थान शेणाने सारवून अन् रांगोळी घालून सुशोभित करतात. मधोमध एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्या भोवती गोवर्‍या आणि सुकी लाकडे रचतात. घरातील कर्त्या पुरुषाने शुचिर्भूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून ‘सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनमहं करिष्ये ।’ असा संकल्प करावा आणि नंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ‘होलिकायै नमः ।’ असे म्हणून होळी पेटवावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालथ्या हाताने बोंब मारावी. होळी पूर्ण जळल्यानंतर ती दूध अन् तूप शिंपडून शांत करावी. श्री होलिकादेवतेला पुरणपोळीचा नैवेद्य, तसेच नारळ अर्पण करावा. मग जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा. नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. सारी रात्र नृत्यगायनात व्यतीत करावी.*होळीची पूजा अशी करावी*…प्रदीपानन्तरं च होलिकायै नमः इति मन्त्रेण पूजाद्रव्य-प्रक्षेकात्मकः होमः कार्यः । – स्मृतिकौस्तुभअर्थ : अग्नी प्रज्वलित केल्यावर ‘होलिकायै नमः’ या मंत्राने पूजाद्रव्ये वाहून होम करावा.निशागमे तु पूज्येयं होलिका सर्वतोमुखैः । – पृथ्वीचंद्रोदयअर्थ : रात्र झाल्यावर सर्वांनी होलिकेचे (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेल्या अग्नीचे) पूजन करावे.होलिकेची पूजा करतांना म्हणायचा मंत्रअस्माभिर्भयसन्त्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।अतस्त्वां पूजयिष्यामो भूते भूतिप्रदा भव ॥ – स्मृतिकौस्तुभअर्थ : हे होलिके (वाळलेली लाकडे आणि गोवर्‍या रचून पेटवलेल्या अग्ने), आम्ही भयग्रस्त झालो होतो; म्हणून आम्ही तुझी रचना केली. यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो. हे होळीच्या विभूती ! तू आम्हाला वैभव देणारी हो.होळीच्या दुसर्‍या दिवशी करायच्या धार्मिक कृतीप्रवृत्ते मधुमासे तु प्रतिपत्सु विभूतये ।कृत्वा चावश्यकार्याणि सन्तर्प्य पितृदेवताः ॥वन्दयेत् होलिकाभूतिं सर्वदुष्टोपशान्तये । – स्मृतिकौस्तुभअर्थ : वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी, यासाठी सकाळी प्रातर्विधी आटोपून पितरांना तर्पण करावे. त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावे.(काही पंचांगांनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी येणार्‍या प्रतिपदेपासून वसंत ऋतूला आरंभ होतो.) होळीच्या दिवशीची ‘होलिका’ ही ‘होलिका’ राक्षसीण नव्हे !भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली ‘होलिका’ ही राक्षसीण होती. होळीच्या दिवशी म्हटल्या जाणार्‍या मंत्रांमध्ये जो ‘होलिका’ असा उल्लेख येतो, तो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहे; त्या राक्षसिणीला उद्देशून नव्हे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतात; म्हणून त्या तिथीला होलिका म्हणतात, असे वरील श्‍लोकांत आलेच आहे.

आयुर्वेदानुसार होळीचे लाभ – थंडीच्या दिवसांत शरिरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतात. होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास साहाय्य होते. सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते. गाणे, हसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते. होळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही न्यून होतो.’ असे वैद्य मेघराज माधव पराडकर,गोवा यांनी म्हटले आहे. होळीतील ‘बोंब मारणे’ या कृतीमागील शास्त्र – हिंदूंचा एक पवित्र सण असलेल्या होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते. ‘होळीच्या दिवशी अश्‍लील शब्द उच्चारणे, शिवीगाळ करणे आदी कृती परंपरा म्हणून केल्या जातात. याला धर्मशास्त्रात आधार नाही. मुळात संस्कृत भाषेत एकही शिवी नाही. असे असतांना ‘शिवीगाळ करणे’ हा हिंदूंच्या सणाचा भाग कसा होऊ शकेल ? होळीच्या दिवशी बोंब मारतांना शिवीगाळ करणे धर्मशास्त्राच्या दृष्टीने चुकीचे आहे. दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहे. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एकप्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा.

होलिकोत्सवातील गैरप्रकार रोखणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे ! – सांप्रत होळीच्या निमित्ताने गैरप्रकार होतात, उदा. वाटमारी होते, दुसर्‍यांची झाडे तोडली जातात, मालमत्तेची चोरी होते, दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. तसेच रंगपंचमीच्या निमित्ताने एकमेकांना घाणेरड्या पाण्याचे फुगे फेकून मारणे, घातक रंग अंगाला फासणे आदी गैरप्रकार होतात. या गैरप्रकारांमुळे धर्महानी होते. ही धर्महानी रोखणे हे आपले धर्मकर्तव्यच आहे. यासाठी समाजाचेही प्रबोधन करा. प्रबोधन करूनही गैरप्रकार घडतांना आढळल्यास पोलिसांत गार्‍हाणे करा. सनातन संस्था समविचारी संघटना आणि धर्मप्रेमी यांच्यासह यासंदर्भात अनेक वर्षांपासून जनजागृती चळवळ राबवत आहे. आपणही यात सहभागी होऊ शकता. वर्षभर होणार्‍या वृक्षतोडीने जंगले उजाड होत असतांना, त्याकडे काणाडोळा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि धर्मविरोधी संघटना वर्षातून एकदा येणार्‍या होळीला ‘कचर्‍याची होळी करा’, अशा स्वरूपाच्या चळवळी राबवतात. ही धर्मविरोधी मंडळी परंपरा नष्ट करण्यासाठीच प्रयत्न करतात, हेच यातून दिसते. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक परंपरांत कोणी लुडबुड करू नये. हिंदूंनो, धर्मविरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता पर्यावरणपूरक, अपप्रकार विरहित; मात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी होळी साजरी करा. संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’संकलन- श्री हेमंत मणेरीकर संपर्क- ९४२३८७३५०९