हुमरस येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न!

कुडाळ: जीवनात केवळ संपत्ती मिळवणे म्हणजे यश नसतं किंवा समाजात प्रतिष्ठा, पद मिळाले म्हणजे यश नसतं तर आपण जेव्हा योग्य ध्येयाच्या दिशेने आणि उद्दिष्ट कृतीकडे वाटचाल करतो त्यालाच यश असे म्हणतात. यश मिळवण्यासाठी आपल्याला हृदयातून पेटून उठावं लागतं. यश प्राप्तीसाठी आपल्या अंगी प्रचंड जिद्द, मेहनत करण्याची वृत्ती, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन असणे गरजेचे आहे, असे मत सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनी हुमरस येथे व्यक्त केले.कुडाळ तालुक्यातील हुमरस येथे ग्रामपंचायतच्या वतीने प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक येथे एक दिवसीय मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरात प्रा. रुपेश पाटील यांनी ‘स्पर्धा परीक्षा तंत्र’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी व्यासपीठावर सरपंच सिताराम तेली, परफेक्ट अकॅडेमी, सिंधुदुर्गचे काऊन्सिलर मंदार सर्वेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परेश वारंग, पंचायत समिती सदस्य स्वप्ना वारंग, निलेश तेली आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. रुपेश पाटील यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थित विद्यार्थी व पालकांना एमपीएससी, यूपीएससी, तसेच विविध स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती दिली. तसेच स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावे? याचे मार्गदर्शन केले. दरम्यान प्रा. पाटील पुढे म्हणाले की, आपल्या आयुष्यात अनेक अडचणी, अडथळे व कसोटीचे प्रसंग येतात. अशावेळी आलेल्या संघर्षावर मात करून, आपण योग्य मार्गदर्शन घेऊन यशाकडे वाटचाल करावी. यशस्वी माणसं अयशस्वी माणसांपेक्षा हुशार नसतात. ती इतरांपेक्षा केवळ सतत प्रयत्नशील असतात आणि म्हणूनच आपल्या अंगी असलेल्या जिद्दीमुळे ती यशोशिखर गाठतात.
सिंधुदुर्ग जिल्हा गुणवंताची खाण, पण स्पर्धा परीक्षेतील टक्केवारी चिंताजनक!

यावेळी प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंत व्यक्तींचा जिल्हा आहे. उत्कृष्ट संसदपटू बॅरिस्टर नाथ पै, जागतिक स्तरावरचे विचारवंत व माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कै. प्रा. मधु दंडवते, लेखक वि. स. खांडेकर, आरती प्रभू यांसारखे अनेक रत्न ह्या च लाल मातीने दिले. परंतु अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षांची टक्केवारी बघता आपल्या युवकांना मार्गदर्शनाची गरज आहे. कारण आपली स्पर्धा परीक्षेतील आपली टक्केवारी खूपच कमी असून ही बाब चिंताजनक असल्याचे प्रा. रुपेश पाटील यांनी नमूद केले.प्रारंभी प्रा. रूपेश पाटील व परफेक्ट अकॅडमी चे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांचा हुमरस ग्रामपंचायततर्फे बुके व सन्मानचिन्ह देऊन सरपंच सिताराम तेली यांनी सन्मान केला. प्रा. राजाराम परब यांच्या वतीने त्यांचा सन्मान मंदार सर्वेकर यांनी स्वीकारला.

कार्यक्रमास एकनाथ परब, अशोक शिवलकर, दाजी वारंग, सोनू मेस्त्री, निलेश तेली, समीर सावंत, सुधाकर मेस्त्री, दिलीप हुमरस्कर, स्वप्निल तेली, स्वप्ना वारंग, स्वप्निल लंगवे, ग्रामसेवक श्री. फुंदे, परेश वारंग, गणेश कांबळी, श्रुती चिपकर, सुमन कुडकर, संजय कुडकर, केंद्रप्रमुख दिनकर तळवणेकर, मुख्याध्यापिका सौ. तळवणेकर,अमित सावंत, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेश तेली यांनी केले.
