Home स्टोरी हिंदळे-मोर्वे शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन!

हिंदळे-मोर्वे शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन!

92


मसुरे प्रतिनिधी:

पावसाळ्यात परिसरात मिळणाऱ्या भाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण व्हावी, यासाठी हिंदळे मोर्वे येथील पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याला पालकांकडून प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रप्रमुख नामदेव सावळे यांच्या हस्ते फीत कापून, तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद सारंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. मुख्याध्यापक पांडुरंग नाडगौडा, शिक्षक प्रवीण सावरे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत परिसरातील रानभाज्यांची माहिती देत त्यांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात व पोषण आहारात यांचा समावेश असावा, असे आवाहन केले. विविध आजारांवर मात करण्यासाठी, आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारामध्ये रानभाज्यांचे महत्त्व याबाबतचे मार्गदर्शन माजी उपसरपंच कंकांद्रीत लोणे यांनी केले. टाकळा, कुई, कारली, करटोली, कटला, शेवगा, अळू यासारख्या विविध प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या. यावेळी शतक महोत्सव समिती अध्यक्ष प्रकाश तळवडकर, ग्रामपंचायत सदस्य महेश कोळंबकर, किर्ती गांवकर आदी उपस्थित होते.