देश विदेश: पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आहे. शनिवारी सकाळी, हमासनं अचानक गाझामधून इस्रायली शहरांवर सुमारे ५,००० रॉकेट डागले. त्यामुळं युद्धाची भीती पाहता रविवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार इस्रायलवर झालेल्या हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत ३०० हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच इस्रायलनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात २०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती मिळत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून सर्व मदतीचं आश्वासन दिलंय.
हमासनं म्हटले की, जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत इस्त्रायलनं केलेल्या अपवित्रतेचा हा बदला आहे. इस्रायली पोलिसांनी एप्रिल २०२३ मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकलं होतं. इस्रायलचे सैन्य हमासच्या ठिकाणावर सातत्यानं हल्लं करत आहे. इस्रायली सैन्य आमच्या महिलांवर हल्ले करत आहे. हमासचं प्रवक्ते गाझी हमद यांनी अरब देशांना इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचं आवाहन केलं आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. व्यापक संघर्ष टाळण्यासाठी सर्व राजनैतिक आवाहन केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, या संकटाच्या काळात मला जगाला, दहशतवाद्यांना सांगायचं, की अमेरिका इस्रायलच्या पाठीशी आहे. मी आज सकाळी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना सांगितलं की अमेरिका इस्रायलच्या लोकांच्या पाठीशी आहे. युद्धात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला दु:ख आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे.
कतारनं इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे, की आंतरराष्ट्रीय समुदायानं इस्रायलला आंतरराष्ट्रीय कायद्याचं घोर उल्लंघन केल्याप्रकरणी थांबविण्यास भाग पाडण्यासाठी त्वरित कारवाई करणं आवश्यक आहे. कुवैतच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्रायलचा कब्जा, वसाहतीचा विस्तार थांबवण्याचं आवाहन केलं आहे. त्याचवेळी इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहनं हमासच्या हल्ल्याचं समर्थन केलंय.
ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लीव्हर्ले यांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला नेहमीच पाठिंबा असल्याचं सांगितलंय. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ म्हणाले की, इस्रायलवरील हल्ल्याच्या वृत्तानं त्यांना धक्का बसला आहे.
सौदी अरेबिया मंत्रालयानं म्हटले आहे की, आम्ही सततचा कब्जा, पॅलेस्टिनींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवल्यामुळं परिस्थितीचा स्फोट होण्याच्या धोक्यांबद्दल वारंवार चेतावणी दिली आहे.