हजारो भाविकांनी अनुभवला संत सत्वदर्शन सोहळा!
मालवण प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा व स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने संत पीठाचे अधिष्ठान श्री विठ्ठल यांच्यासह श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत पुंडलिक, संत गोरा कुंभार, संत नामदेव या संत सत्वदर्शन सोहळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आशीर्वाद घेण्यासाठी हजारो स्वामी भक्तांनी उपस्थिती दर्शविली.
केंद्रीयमंत्री नारायण राणे, आम नितेश राणे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरानी स्वामींचे दर्शन घेतले. प्रकट दिन व मठाच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ९ एप्रिल रोजी शिरगाव येथील श्री पावणादेवी मंदिरापासून श्री स्वामी समर्थ मठापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी विठ्ठल आणि पाच संतांच्या मंदिरातील सत्वांचे मठात आगमन झाले. बुधवारी १० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. पादुकापूजन, श्रींची महापूजा, लघुरुद्र, कुंकुमार्चन, नामस्मरण, दुपारी पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी प्रज्ञा देशपांडे (पुणे) यांचे कीर्तन, श्री भगवती कला दिंडी (तोरसोळे) यांचा कार्यक्रम, हरी ओम प्रासादिक भजन मंडळाचे बुबा तन्मय परब विरुध्द श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळाचे बुवा सुशांत जोईल यांच्यामध्ये डबलबारी भजनाचा सामना झाला. उत्सव निमित्त गाभाऱ्यात फळांची आकर्षक आरास करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या सह मुंबई व गाव समिती सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.