कुडाळ (मुळदे): महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कृषी क्षेत्रातील आधारस्तंभ स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै २०२५ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये वसंतराव नाईक जयंतीनिमित्त अभिवादन व प्रेरणादायी भाषणे तसेच वृक्षारोपण उपक्रम यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. दळवी यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेत प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सुमारे १००० झाडांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये बांबू (माणगा व माणवेल), केळी, केशर आंबा, काळी मिरी, नारळ, सुपारी अशा प्रजातींचा समावेश होता.
या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन डॉ. व्ही. व्ही. दळवी, सहयोगी अधिष्ठाता यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व अंमलबजावणी प्रक्षेत्र अधीक्षक डॉ. एम. एस. शेडगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.कार्यक्रमामध्ये NCC अधिकारी प्रा. हर्षवर्धन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली NCC कॅडेट्स तसेच NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. आर. उईके यांच्या नेतृत्वाखाली NSS स्वयंसेवकांनी विशेष सहभाग नोंदवला. त्यांनी वृक्षलागवडीसाठी गट तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने झाडे लावण्यात पुढाकार घेतला.
या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिक्षक निहाय व वर्गनिहाय गट तयार करून वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राविषयी आदर, पर्यावरण जागृती व सामाजिक बांधिलकी निर्माण करणे हाच होता. वसंतराव नाईक यांच्या कृषीविषयक कार्याची प्रेरणा घेत हरित क्रांतीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल या वृक्षारोपण उपक्रमातून टाकण्यात आले.