सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्विमिंग पूलमध्ये प्रशिक्षक व लाईफ गार्ड यांच्या हलगर्जीपणामुळे ग्लेन जॉन डिसोजा या १९ वर्षीय मुलाचा ७ मे रोजी मृत्यू झाला होता. मात्र, अद्यापी या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले नसल्याने याप्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे, असा इशारा मृत मुलाचे वडिल जॉन ॲलेक्स डिसोजा यांनी दिला आहे.
याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्विमिंग पूलमध्ये प्रशिक्षक व लाईफ गार्ड यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे आपला मुलगा मृत्यू पावला. परंतु, तत्कालीन मुख्याधिकारी, प्रशिक्षक व लाईफ गार्ड आदी सर्व संबंधितांच्या विरोधात अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
संबंधित प्रशिक्षक, लाईफगार्ड तसेच सावंतवाडी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करणेसंदर्भात, संदर्भीय नमुद निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे. परंतु स्विमिंगपुलचे कंत्राटदार व ट्रेनर यांचावर भा.द.वि. कलम ३०४ ऐवजी ३०४ए अन्वये गुन्हा दाखल करून पुढे काहीच कारवाई झालेली नाही.
माझा एकुलता एक मुलगा ग्लेन जॉन डिसोजा, वय १९ वर्षे याचा मृत्यु झालेने माझ्या कुटुंबाचा आधारच हरपलेला आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी हे माझ्या मुलाचे मृत्युस कसे कारणीभूत आहेत याचे संदर्भीय निवेदनामध्ये सविस्तर विवेचन केलेले आहे. असे असता आजमितीपर्यंत त्यांचेवर कोणतीच कारवाई झालेली नाही. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने या प्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम ३०४ए ऐवजी कलम ३०४ लागू होणे आवश्यक आहे. याबाबत वेळोवेळी विनंती केलेली आहे .म्हणून, या विषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे कार्यालयासमोर १ दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसणार आहे, असा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.