Home Uncategorized स्वातंत्रवीर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६)

स्वातंत्रवीर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६)

71

विनायक दामोदर सावरकर (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६)

भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी. सावरकर कुटुंब हे कोकणातील गुहागर पेट्यातून देशावर आले. गुहागरजवळ सांवरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. त्यावरून ‘सावरकर’ हे आडनाव आले असावे, असा अंदाज प्रत्यक्ष सावरकरांनीच केला आहे. थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी.पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता.त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला,रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते. ८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी ह्या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड ह्याचा खून केला आणि ह्या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला, आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली.१८९९ सालामध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले; तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० सालामध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी गोविंद ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ सालामध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून जोसेफ मॅझिनी ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण; सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे; रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे; इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे; शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते.मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता.परिणामतः त्यांना दंड भरावा लागला, आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी दिनांक ९ जून १९०६ साली ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली, त्यांचे तीन भाग सांगता येतील :(१)साहित्यनिर्मिती, (२) प्रकट चळवळी आणि समारंभ, (३) गुप्त क्रांतिकार्य.